अठरापगड जातीधर्मामधील कार्यकर्त्यांना एमआयएम मध्ये सामावून घेणार : एमआयएम म्हणजे मुस्लिम शिक्का पुसणार : ग्रामीण भागात एमआयएमचा विजयी झेंडा फडकविणार : शौकत पठाण यांचा निर्धार महानगरपालिकेच्या निवडणुकीत २५ नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न.

 



सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगरपरिषदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सर्व जाती- धर्मातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तसेच इच्छुकांशी शासकीय विश्रामगृहात चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे एमआयएमचे नूतन जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी ८ जुलै रोजी शासकीय विश्रामगृहात होणाऱ्या बैठकीमध्ये नवीन पदाधिकारी निवडीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. जुनी बॉडी बरखास्त झाल्यामुळे आता नव्याने एमआयएमचे ग्रामीण भागातील पदाधिकारी निवडण्यात येणार आहेत. इच्छुकांनी ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृहात उपस्थित राहावे, असे आवाहन एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी केले आहे.

  एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुका मोठ्या ताकदीने लढविण्यात येणार आहेत.कोणासोबत आघाडी करायची याबाबतचा निर्णय एमआयएमचे वरिष्ठ ठरविणार आहेत. तरीसुद्धा सन्मान जनक वागणूक दिल्यास काँग्रेससोबत आघाडी करण्याचा विचार केला जाईल, असेही शौकत पठाण यावेळी बोलताना म्हणाले.

  दरम्यान आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणूकीत सर्व अठरापगड जातीमधील कार्यकर्त्यांना एमआयएममध्ये सामावून घेऊन महापालिकेत २५ नगरसेवक निवडून आणणार असल्याचे , एमआयएमचे जिल्हाध्यक्ष पठाण यांनी सांगितले.

    एमआयएमच्या माध्यमातून रस्ते, वीज, पाणी यासह आरोग्याच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष दिले जाणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष पठाण यावेळी बोलताना म्हणाले. आगामी सोलापूर महानगरपालिकेची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलाल यांनी आपल्या खांद्यावर दिली आहे. जिल्हाध्यक्ष निवडीच्यावेळी त्यांनी दिलेल्या जबाबदारीचे आपण निश्चितच पालन करणार आहोत. सोलापूर महापालिका निवडणुकीत एमआयएम ४० जागा लढविणार असून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. काँग्रेस तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत आघाडी करण्याचा विचार सुरू आहे.निवडणुकीच्या तोंडावर त्याचा निर्णय होईल असेही पठाण म्हणाले. 

  नई जिंदगी, शास्त्रीनगर, मौलाली चौक,विजापूर नाका,बाशा पेठ या भागामध्ये जवळपास सर्व जाती-धर्मांना उमेदवारी देऊन एमआयएम २२ ते २५ नगरसेवक निवडून आणणार असल्याचेही पठाण यांनी सांगितले. भाजप आणि शिवसेना यांच्या विरोधातच एमआयएमची खरी लढत असणार असल्याचेही शौकत पठाण यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.सर्व जाती धर्मातील लोकांना एमआयएमचे दरवाजे उघडे ठेवण्यात आले आहेत. एमआयएम म्हणजे फक्त मुस्लिम समाज हा शिक्का आता सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अठरापगड जातीला एकत्र घेऊन पुसला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षातील जवळपास सहा ते सात नगरसेवक तसेच आणि पदाधिकारी एमआयएममध्ये निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश करतील. त्यांनाही एमआयएममध्ये योग्य सन्मान दिला जाणार आहे, असेही पठाण म्हणाले.

Post a Comment

0 Comments