सोलापूर (प्रतिनिधी ) भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या तक्रारीनंतर पालकमंत्र्यांनी तंबी दिल्याने सोलापुरातील खुलेआम सुरू असलेला मटका पोलिसांनी अखेर ‘क्लोज” केला आहे तर दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील क्लब मात्र ‘ओपन”च असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सोलापुरात पदभार घेतल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र यादरम्यानच लोकसभेच्या निवडणुका आल्या. या निवडणुकीत भाजपला मोठाच दणका बसला. सोलापूर व माढा लोकसभेची जागा भाजपच्या हातून गेली आणि त्यानंतर आता भाजपमध्ये आत्मचिंतन सुरू झाले आहे. सोलापुरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या. यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील एका काँग्रेस नेत्याने अवैद्य धंद्याबद्दल दिलेल्या प्रतिक्रियेवरून वादंग उठले आहे. त्यावर एका माजी मंत्र्याने भाजपचेच लोक अवैध धंद्यात सक्रिय असल्याचा आरोप केला आहे. याबाबत माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने पोलीस आयुक्त एम. राजकुमार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना या बातम्या शेअर करून सवाल उपस्थित केला आहे. त्यानंतर नुकताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी पोलिसांना चांगलेच खडसावल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सोलापुरातील मटका ‘क्लोज” करण्यात आला आहे. फौजदार चावडी व जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेले दोन ‘क्लब” सुरळीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंढे यांची आठवण येत आहे…
भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंढे गृहमंत्री असताना सोलापुरातील अवैध धंदे पूर्णपणे बंद होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्व. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना ही स्थिती दिसून आली होती. महाविकास आघाडी व आता महायुतीची राज्यात सत्ता असताना अवैध धंद्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. यात गोरगरीब जनता भरडली जात असून अवैद्य धंदेवाल्यांची मात्र चलती आहे. अलीकडचे भाजपचे पदाधिकारीही अवैध धंद्यात सक्रिय झाल्यामुळे याला चालना मिळाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे लोकसभा निवडूकीत
भाजपला फटका बसला. आता विधानसभा निवडणुकीतही जनता जागा दाखवेल, असा इशारा भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला आहे. आम्हाला आमचे ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंढे यांची आता आठवण येत आहे, असे या ज्येष्ठ नेत्याने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या तक्रारीची दखल घ्यावी लागली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या तक्रारीची दखल घेत सोलापुरातील मटका ‘क्लोज” करण्याची पोलिसांना तंबी दिल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी मटका ‘क्लोज” केला पण इतर अवैध धंद्याचे काय? असा आता नागरिकांतून सवाल उपस्थित केला जात आहे.माध्यमात प्रसिद्ध झालेल्या अवैध धंद्याच्या बातमीवरून मीच पोलीस आयुक्त, पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. अवैद्य धंद्याबाबत मी तक्रार केली की आमचे लोक माझा काही स्वार्थ आहे, अशी ओरड करतात. पण लोकसभा निवडणुकीत आम्हाला अवैध धंद्याचाही फटका बसला आहे. अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याने भाजपची बदनामी सुरू आहे. याबाबत एकातरी लोकप्रतिनिधीने आवाज उठवावा अशी जनतेची इच्छा आहे. त्यामुळे मी केलेली तक्रार खरी आहे.
सुरेश पाटील,
माजी मनपा सभागृह नेता भाजपा.
0 Comments