Type Here to Get Search Results !

सिद्धेश्वर मंदिराजवळ चार लाखांची चोरी, तमिळनाडूतील सात जणांना अटक तीन लाख रक्कमसह लॅपटॉप जप्त फौजदार चावडी पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी

 



सोलापूर (प्रतिनिधी ) सिद्धेश्वर मंदिर परिसरात उपचारासाठी आलेल्या भाविकाच्या कारच्या काचा फोडून तब्बल चार लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा फौजदार चावडी पोलिसांच्या डी.बी. पथकाने पर्दाफाश केला. तमिळनाडूतील सात सराईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या चौकशीत सोलापूरसह महाराष्ट्र व तेलंगणातील कारफोडीच्या सात गुन्ह्यांची उकल झाली आहे.

शहरात कारच्या काचा फोडून चोरी तसेच घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू केला होता. सिद्धेश्वर मंदिर परिसरातील चोरीच्या घटनेचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून संशयितांचा माग काढला. टोळीतील संशयित आळंदी आणि मिरज परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाडी टाकल्या. दरम्यान, आरोपी पुन्हा सोलापूर शहरात चोरीच्या उद्देशाने आल्याची माहिती मिळाल्यानंतर पंचकट्टा ते होम मैदान परिसरात पोलिसांनी सापळा रचला. या कारवाईत सात जणांना ताब्यात घेण्यात आले.


ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पोलिसांनी तीन लाख रुपयांची रोकड, लॅपटॉप बॅग आणि कागदपत्रे हस्तगत केली आहेत. आरोपी केवळ तमिळ भाषा बोलत असल्याने दुभाषिकाच्या मदतीने त्यांची चौकशी करण्यात आली. न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

तमिळनाडूतील सात आरोपी ताब्यात

ताब्यात घेण्यात आलेले सर्व आरोपी तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली आणि दिंडीगुल जिल्ह्यातील आहेत. षण्मुगम अमरनाथन, आदितन थंडयुथपाणी, सेरन मुकुंधन, आनंद विश्वनाथन, जगन बालसुब्रम्हण्यम, मनोजकुमार अनबलगन आणि कमलकन्नन गणेशन अशी त्यांची नावे आहेत. हे आरोपी मजुरीच्या बहाण्याने विविध भागांत फिरत आणि कारची पाहणी करून संधी साधून काचा फोडून चोरी करत असल्याचे तपासात समोर आले.

महाराष्ट्रासह तेलंगणातील सात गुन्हे उघड

पोलिसांच्या तपासात या टोळीने सोलापूर शहरात दोन, भाईंदर-काशीमीरा येथे एक, तुळजापूर येथे एक, दिघी (पिंपरी-चिंचवड) येथे एक, तर हैदराबादमधील महाकाली आणि पंजागुट्टा येथे प्रत्येकी एक असे एकूण सात कारफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व गुन्ह्यांबाबत पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त प्रितम यावलकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकातील शिवानंद भीमदे कृष्णात बडूरे रवी धेंडे सुधाकर माने विनोद पुजारी विनोद व्हटकर कुमार शेळके वसंत गौडनवरू दत्तात्रय कोळवले आयाज बागलकोटे प्रकाश गायकवाड मछिंद्र राठोड बसवराज परीट पंकज घाडगे विनायक जाधव अजय चव्हाण सूरज सोनवलकर नितीन मोरे स्वप्नील मोरे तोसिफ शेख सचिन बाबर आतिष पाटील शशिकांत दराडे ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.