Type Here to Get Search Results !

आईच्या अस्थींच्या रक्षेने लावली फळझाडे, पारंपारिक प्रथेला फाटा देत शेंडेकर कुटुंबियांचा स्तुत्य उपक्रम

 



मोहोळ ( अमर पवार )

काळाच्या ओघात अनेक रूढी-परंपरांना फाटा देत समाजासमोर एक नवा आणि आदर्श पायंडा पाडणाऱ्या घटना समोर येत आहेत. मोहोळ तालुक्यातील वडदेगाव येथील शेंडेकर कुटुंबियांनी अशाच एका क्रांतिकारी आणि पर्यावरणपूरक निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. आपल्या दिवंगत आईच्या अस्थी आणि रक्षा नदीत विसर्जित न करता, त्या रक्षेचा उपयोग करून शेतात फळझाडांची लागवड करत त्यांनी 'तिसरा' (उत्तरकार्य) आटोपला. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दीर्घ आजाराने आईचे निधन .

वडदेगाव येथील कै.

नंदाबाई सोपान शेंडेकर (वय ६२) यांचे २५ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्या संधिवाताने आजारी होत्या. आजारपणात कुटुंबियांनी त्यांच्यावर योग्य औषधोपचार व सुश्रुषा केली, परंतु शरीराची झिज झाल्याने अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शेतीनिष्ठ शेंडेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात पती, तीन विवाहित मुली, जावई, मुलगा, सून आणि ११ नातवंडे असा मोठा परिवार आहे. श्री. सोपान शेंडेकर आणि त्यांच्या सहा भावंडांचा वडदेगाव येथे एकत्र मोठा प्रपंच आहे.

'नदी प्रदूषण' रोखत आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचा घेतला आदर्श

आईची माया, तिचे संस्कार आणि तिचे स्मरण कायम राहावे, यासाठी शेंडेकर कुटुंबियांनी पारंपरिक प्रथेला फाटा देण्याचे ठरवले.

अस्थी आणि रक्षा नदीत विसर्जन केल्याने जलप्रदूषण होते, हे ओळखून त्यांनी या रक्षेचा वापर करून आपल्या शेतात विविध फळझाडे लावण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना त्यांनी प्रसिद्ध आयएएस (IAS) अधिकारी श्री. तुकाराम मुंढे यांच्या अशाच एका आदर्श उपक्रमाचा डोळ्यांसमोर आदर्श ठेवला.

शेतात लावली चिकू, आंबा आणि जांभळाची झाडे

काल गुरुवारी आईच्या 'तिसऱ्या' निमित्त शेंडेकर कुटुंबियांनी शेतात चिकू, आंबा, जांभूळ यांसारखी विविध फळझाडे आणली. या रोपांची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून, खण अर्पण करून रोपण करण्यात आले. त्यानंतर आईच्या अस्थींची राख त्या रोपांच्या बुंध्याशी खत म्हणून पसरण्यात आली.

काळ्या आईच्या उदरात सदैव राहील जन्मदात्री आई!

"जन्म देणारी आई आता आपल्याला जगवणाऱ्या या काळ्या आईच्या (मातीच्या) उदरात सदैव जिवंत राहील.


या उपक्रमामुळे दीर्घकाळ आईची माया आम्हाला या झाडांच्या सावलीतून आणि फळांमधून मिळत राहील, तसेच नदीचे होणारे प्रदूषणही थांबेल, याच भावनेतून आम्ही हा निर्णय घेतला," अशी भावना कुटुंबियांनी व्यक्त केली.

शेंडेकर परिवारासह ग्रामस्थांचा पुढाकार

दुःखाच्या प्रसंगातून सावरत घेतलेल्या या धाडसी व पर्यावरणपूरक निर्णयाला संपूर्ण गावाने बळ दिले. यामध्ये कै. नंदाबाई यांचे सुपुत्र सागर शेंडेकर, पती सोपान शेंडेकर, तसेच वडदेगावचे माजी उपसरपंच श्री. बजरंग शेंडेकर, गणेश शेंडेकर, सदाशिव शेंडेकर, राजू शेंडेकर, तानाजी शेंडेकर, धनाजी शेंडेकर, पृथ्वीराज शेंडेकर, बाळासाहेब वसेकर, प्रवीण वसेकर, अमर शेंडेकर तसेच त्यांच्या मुली, जावई आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेतला. दुःखाच्या प्रसंगातही समाजभान जपणारा शेंडेकर कुटुंबियांचा हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद आणि दिशादर्शक ठरला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.