सोलापूर (प्रतिनिधी ) शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सांगता मिरवणुकीच्या निमित्ताने प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून मोठ्या आवाजात डॉल्बी (साउंड सिस्टम) लावणाऱ्या एका मंडळावर फौजदार चावडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
या कारवाईत पोलिसांनी २० लाख ७० हजार रुपये किमतीचे डॉल्बीचे साहित्य आणि एक वाहन जप्त केले असून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
सोलापूर शहरात १९ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांगता मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यास पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी मनाई आदेश लागू केले होते. मिरवणूक दुपारी १२:०० वाजता सुरू होणार होती, मात्र त्यापूर्वीच मध्यरात्री १२:३० च्या सुमारास सरस्वती चौक येथे 'आम्रपाली बहुउद्देशीय सामाजिक संस्था' (आम्रपाली चौक, न्यू बुधवार पेठ) या मंडळाने कार्यकर्त्यांना जमा करून परवानगी नसतानाही कर्कश आवाजात हिंदी व मराठी गाणी लावली.
उपस्थित पोलिसांनी त्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वास्तविक पाहता मिरवणुकीत डॉल्बी वापरण्यास पूर्णपणे बंदी होती.
याप्रकरणी आम्रपाली बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी १) कपील सुरवसे, २) आकाश वामणे, ३) साजन गायकवाड, ४) आदित्य सोनकांबळे, ५) बाबु घागरे, ६) अविनाश गायकवाड (सर्व रा. सोलापूर) तसेच डॉल्बी सिस्टीम मालक प्रेम संजय पवार (रा. श्रद्धा कॉलनी, पिंपरी चिंचवड, पुणे) यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२० लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी या कारवाईत खालील साहित्य जप्त केले आहे:
०४ बेस, ०४ टॉप, ०१ मिक्सर, ०२ ॲम्पलीफायर, ०१ पॉवर ट्रॉली.
अशोक लेलँड दोस्त गाडी (क्रमांक MH 14 MH 9684).
असा एकूण २०,७०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तानाजी दराडे व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर बसवेश्वर परीट जगदीश कोल्हे शिवानंद बिंबदे विनोद पुजारी कृष्ण बडूरे विनायक जाधव रवी धेंडे विनोद वटकर अजय चव्हाण आतिश पाटील ज्ञानेश्वर गायकवाड अमोल खरटमल सूरज सोनवलकर सुधाकर माने नितीन मोरे पंकज घाडगे यांनी केली आहे.
