सोलापूर (प्रतिनिधी ) आखाती देशातील युद्धामुळे मध्यंतरी
गॅसचा तुटवडा जाणवत होता. गॅस मिळत नसल्याने एजन्सीसमोर ग्राहकांची मोठी गर्दी होत होती. आता गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी जवळपास नाहीशा झाल्या आहेत. ग्राहकांना वेळेवर मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासन व पेट्रोलियम कंपन्यांनी सहा हेल्पलाइन सुरू केल्या होत्या. या हेल्पलाइनवर येणाऱ्या तक्रारी आता नगण्य झाल्या असल्याची माहिती सोलापूरचे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिली. तक्रारी कमी झाल्या असल्या तरीही गॅस पुरवठ्याचे जुनेच नियम सध्या अंमलात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मार्चअखेर व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गॅस तुटवड्याच्या तक्रारींची संख्या प्रचंड होती. ग्राहकांच्या तक्रारींसाठी जिल्हा प्रशासनाने तीन आणि बीपीसीएल, आयओसीएल, एचपीसीएल या तीन पेट्रोलियम कंपन्यांनी प्रत्येकी एक, अशा तीन हेल्पलाइन सुरू केल्या होत्या. या सहा हेल्पलाइनच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे
जवळपास ५०० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. हेल्पलाइनच्या माध्यमातून प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींचा जिल्हा प्रशासन व पेट्रोलियम कंपन्यांनी अभ्यास करून मार्ग काढला आहे. त्यामुळे आता गॅस पुरवठ्याची स्थिती सुधारली आहे. गॅस मिळत नसल्याच्या तक्रारींची संख्या आता कमालीची घटली आहे.
तक्रारींची संख्या कमी असली तरी अजूनही ग्राहकांना घरपोच गॅस दिला जात आहे. शहरी भागात गॅस बुकिंगसाठी २५ दिवस आणि दुसऱ्या सिलिंडरच्या बुकिंगसाठी ३५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील गॅस बुकिंगसाठी ४५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. गॅस बुकिंगबाबत वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतरच यामध्ये बदल केले जातील, अशी माहितीही अन्नधान्य वितरण अधिकारी पडोळे यांनी दिली आहे.
