सोलापूर(प्रतिनिधी ) खोटे आणि बेछुट आरोप करून पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांविरुद्ध ५ कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षा शाखेचे सहाय्यक पोलीस उप-निरीक्षक बाळासाहेब रामदास गायकवाड यांनी दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयात हा दावा ठोकला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोलापूर युवक अध्यक्ष सुहास विजय कदम (रा. सलगर वस्ती, सोलापूर) आणि सोलापूर शहर जिल्हा अध्यक्ष व पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश सुरेश पाटील (रा. नरखेड, ता. मोहळ) अशी दावा दाखल करण्यात आलेल्या नेत्यांची नावे आहेत.
काय आहे प्रकरण?
दिलेल्या माहितीनुसार, १ जून २०२६ रोजी सुहास कदम आणि उमेश पाटील यांनी पक्षाच्या लेटरहेडवर सहाय्यक पोलीस उप-निरीक्षक बाळासाहेब गायकवाड हे 'भ्रष्ट अधिकारी' असल्याचे आरोप करत मा. पोलीस उप-आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर १० जून २०२६ पासून त्यांनी सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयाजवळील पूनम गेट येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले.
उपोषणाच्या ठिकाणी लावलेल्या बॅनर्सवर बाळासाहेब गायकवाड, पोलीस हवालदार भागवत शिंदे आणि राजू चव्हाण यांच्यावर 'वसुलदार' असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. या अधिकाऱ्यांकडे शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचा दावा करत लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) आणि आयकर विभागामार्फत चौकशीची मागणी त्यांनी केली होती. तसेच स्थानिक वृत्तवाहिन्या व पत्रकारांना मुलाखती देऊन ही माहिती प्रसिद्ध केली होती.
समाजात आणि पक्षात प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न
बाळासाहेब गायकवाड यांनी आपल्या याचिकेत नमूद केले आहे की, हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे, जाणीवपूर्वक आणि वैयक्तिक हेतूने करण्यात आले होते. यामुळे समाजात अन्य खात्यात , नातेवाईक आणि मित्रांमध्ये त्यांची पद व प्रतिष्ठा मलीन झाली आहे.
ऍडव्होकेट प्रवीण शेंडे यांनी
न्यायालयात दाखल पुरावे व संदर्भ
या ५ कोटींच्या अब्रू नुकसानीच्या दाव्यात बाळासाहेब गायकवाड यांनी आजपर्यंत पोलीस दलात बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा, मिळालेल्या प्रशस्तीपत्रकांचा, पुरस्कारांचा व बक्षीसांचा सविस्तर उल्लेख केला आहे. यासोबतच आरोप करणाऱ्या सुहास कदम आणि उमेश पाटील यांच्यावर यापूर्वी दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांची माहिती व तपशील देखील न्यायालयात सादर करण्यात आला आहे.
या कायदेशीर कारवाईमुळे सोलापूरच्या राजकीय व पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
