Type Here to Get Search Results !

पोलीस उपनिरीक्षक खाजा मुजावर यांची बदनामी मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा




सोलापूर (प्रतिनिधी ) वरिष्ठांनी दिलेल्या आदेशावरून कारवाई केल्याचा राग मनात धरून सोलापूर ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक म. इसाक उर्फ खाजा मुजावर यांची बदनामी केल्याप्रकरणी लोकशासन आंदोलन पार्टीचे मारुती नारायण जाधव (रा. ए 20, सिटीजन पार्क, विजापूर रोड सोलापूर) व राजाभाऊ गुरुपाद दिंडोरे (रा. न्यू पाछा पेठ, अशोक चौक) या दोघांविरुद्ध अब्रू नुकसानीचा विशेष दावा दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.


लोकशासन आंदोलन पार्टी या नावे लेटरपॅड तयार करून मारुती जाधव व राजाभाऊ दिंडोरे या दोघांनी आठ जून 2026 रोजी पत्रकार परिषद घेऊन जाणीवपूर्वक पोलीस उपनिरीक्षक मुजावर यांच्याविरुद्ध खोटा व बदनामीकारक मजकूर तयार करून मुलाखत दिली. यात त्यांनी जनमानसात मुजावर यांचे पद व प्रतिष्ठा कमी व्हावी, प्रतिमा मलीन व्हावी या उद्देशाने खोटे आरोप केले. तसेच दिनांक 10 जून रोजी पुनम गेट येथे हलगी वाजवून व स्वतःच्या अंगाला झाडाचा पाला लावून मोठ्या बॅनरवर खोटा व बदनामीकारक मजकूर व फोटो प्रसिद्ध केला. या प्रकाराविरोधात फौजदार मुजावर यांनी वरिष्ठाच्या परवानगीने या दोघांविरुद्ध दिवाणी न्यायाधीश वनकोरे यांच्या न्यायालयात विशेष अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला असून त्यांच्यावतीने ऍड. प्रवीण शेंडे हे काम पाहत आहेत. 





विशेष म्हणजे जाधव व दिंडोरे यांनी पुनम गेटवर केलेल्या प्रदर्शनातील बदनामीविरुद्ध फौजदार मुजावर यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे. या दोघांविरुद्ध मोहोळ, विजापूरनाका, कामती, जेलरोड पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली सहा गुन्हे दाखल आहेत. जिल्हा दंडाधिकारी यांनी मारुती जाधव यांच्याविरुद्ध एमपीडीए अधिनियमअंतर्गत कारवाईचे आदेश दिले होते. वरिष्ठांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी फौजदार मुजावर यांच्यावर दिली होती. त्यांनी या आदेशाची अंमलबजावणी करत जाधव यांच्यावर कारवाई केली होती. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या लोकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा राग मनात धरून जाणीवपूर्वक खोटे व गंभीर आरोप केल्याने पोलिसांनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल केल्याने असे कृत्य करणाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.