सोलापूर (प्रतिनिधी ) बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गेल्या वर्षभरात गोवंश वाहतूक करणे, गाड्या अडविणे किंवा मारहाण करणे यासारखे इतर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ५० आरोपींची थेट पोलिस उपायुक्त प्रीतम यावलकर यांनी स्वतः हजेरी घेतली.
या प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेल्या जवळपास ५०
आरोपींना शनिवारी पोलिस उपायुक्त कार्यालयात बोलविण्यात आले होते. या सर्वांची कसून चौकशी करत त्यांना सणाच्या काळात शांतता कडक राखण्याबाबत ताकीद देण्यात आली आहे. पोलिसांचे हे कडक पाऊल एवढ्यावरच थांबणार नसून, येत्या सोमवारी (दि.२५) आणखी काही अशाच रेकॉर्डवरील आरोपींना हजेरीसाठी
बोलावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिस उपायुक्तपदाची पदभार घेतल्यापासून त्यांनी गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनेक मोहिमा हाती घेतल्या आहेत. शहरवासियांमधून त्यांच्या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
*विशेष खबरदारी*
वर्षभरात ज्यांच्यावर गोतस्करीचे गुन्हे दाखल झाले आहेत किंवा वारंवार त्याच पद्धतीचे गुन्हे करणाऱ्यांना हजर करण्यास सांगितले आहे. त्यांना विशेष सूचना देऊन पुढे असे गुन्हे घडू नये यासाठी खबरदारी घेत आहोत, असे पोलिस उपायुक्त प्रीतम यावलकर यांनी सांगितले.
