Type Here to Get Search Results !

सोलापूर शहरातील मटका, जुगार व इतर अवैध व्यवसाय तात्काळ बंद करण्याबाबत पोलिस आयुक्तांना निवेदन सोलापूर शहर युवक काँग्रेसची मागणी




सोलापूर (प्रतिनिधी ) खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये मटका, जुगार, दारूधंदे तसेच इतर अवैध व्यवसाय तात्काळ बंद करून कठोर कारवाई करण्याबाबत सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखालील सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांना निवेदन.


या निवेदनात अवैध धंद्यांमुळे सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेषतः मटका व जुगाराच्या वाढत्या विळख्यात अनेक गोरगरीब नागरिक अडकत असून अनेकांचे संसार आर्थिकदृष्ट्या उध्वस्त होत आहेत. कष्टाने मिळविलेला पैसा या व्यसनाधीन प्रवृत्तींमध्ये खर्च होत असल्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत आहे. युवक वर्ग चुकीच्या मार्गाला लागून व्यसनाच्या आहारी जात असून समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागण्याचा धोका निर्माण झाला आहे.मटका व अवैध व्यवसायांच्या माध्यमातून काही ठिकाणी खुलेआम पैशांची उलाढाल सुरू असून यामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत आहे. सर्वसामान्य नागरिक, महिला, तरुण व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अनेक पालक आपल्या मुलांच्या भविष्याबाबत चिंताग्रस्त आहेत.


तरी आपण या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन सोलापूर शहरातील सर्व मटका अड्डे, जुगार अड्डे व इतर अवैध व्यवसायांवर कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करावी. संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत. तसेच शहरातील युवक व गोरगरीब नागरिकांना या व्यसनाच्या विळख्यातून वाचविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी.


यावेळी गणेश डोंगरे म्हणाले सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून नागरिकांना सुरक्षित आणि निरोगी सामाजिक वातावरण उपलब्ध करून द्यावे व यासंदर्भात तात्काळ कारवाई न झाल्यास सोलापूर शहरातील ज्या-ज्या भागांमध्ये मटका व अवैध धंदे सुरू आहेत, त्या संबंधित पोलिस ठाण्यांसमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सोलापूर शहर युवक काँग्रेस वतीने देण्यात आला.


यावेळी विवेक कन्ना,आशुतोष वाले,महेंद्र शिंदे,विवेक इंगळे,आकाश जांभळे,सचिन पवार,योगेश रणधिरे,अस्लम शेख,सोपान मिसाळ,शशीकांत शेळके, प्रवीण चव्हाण,आकाश नाईक,रिहान शेख आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.