.सोलापूर (प्रतिनिधी ) ०४/०५/२०२६ रोजी रात्री ०९:०० वा. ते दि. ०५/०५/२०२६ रोजी सकाळी ०७:०० वा. चे दरम्यान फकीरा चौक न्यु बुधवार पेठ सोलापूर येथील दोन ठिकाणी बंद घराचे कडी कोयंडा उचकटून व कुलूप तोडून, घरांमध्ये कपाटात ठेवलेली रोख रक्कम रु. १७,५००/- व एक लहान मुलाचे कानातील बाली असा एकुण ४७,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी नेल्याचे निदर्शनास आले. या बाबत तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारींवरून (१) जोडभावी पेठ पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गु.र.नं. ४३७/२०२६ भा.न्या.सं. २०२३ कलम ३०५ (ए), ३३१ (४) प्रमाणे व (२) गु.र.नं. ४३९/२०२६ भा.न्या.सं. २०२३ कलम ३०५ (ए), ३३१ (४) प्रमाणे घरफोडी-चोरीचे ०२ गुन्हे दाखल आहेत रात्रीच्या वेळी घरफोडीच्या दोन घटना, न्यु बुधवार पेठ परिसरात एकाच रात्री घडल्या होत्या, घटनांचे गांभीर्य ओळखुन शहर गुन्हे शाखेचे सिंघम वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. व्ही गळवे व त्यांचे पथकातील अंमलदारांनी गुन्ह्याच्या ठिकाणी भेट दिली. मिळालेल्या सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकाने सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केला असल्याची खात्री केली. तसेच सपोनि जे. व्ही गळवे व त्यांचे पथकाने कौशल्याने तांत्रीक माहिती मिळवून माहितीच्या आधारे आरोपीतांचा शोध घेत असताना, दि. १२/०५/२०२६ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने पुणे शहरात जावून, आंतरजिल्हा रेकॉर्डवरील सराईत आरोपी नामे, (१) दिपक बाळू ढेरंगे वय-३४ वर्षे, व्यवसाय :- मजूरी रा. ढेरंगे वस्ती, कोरेगांव भिमा, ता. शिरुर जि. पुणे (२) दत्ता अरुण कदम वय-३८ वर्षे, व्यवसाय :-मजूरी, रा. १०२, माऊली मंगल कार्यालयाचे समोर, अभिनव कॉलेज रोड, न-हे ता. हवेली जि.पुणे (३) आकाश सुर्यकांत आंग्रे वय-२९ वर्षे, व्यवसाय मजूरी रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी गॅस गोडावून जवळ, पुणे (४) साहेबराव लक्ष्मण बेंडूरे वय-५३ वर्षे, व्यवसाय चालक रा. नवागांव दहिसर वेस्ट, मुंबई यांना पुणे येथे ताब्यात घेतले. आरोपींकडे केलेल्या तपासामध्ये त्यांनी त्यांचेकडील मारुती सुझुकी इको कारमधून पुणे येथून सोलापूरात येवून, वरील नमुद दोन घरे, एकाच रात्री फोडल्याची कबूली देवून, संगनमताने गुन्हा केल्याचे मान्य केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकाने आरोपींकडून, रोख रक्कम रु. १५,०००/- रुपये ३०,०००/- किंमतीचा सोन्याचा एक दागिना व गुन्हा करणेकामी आरोपींनी वापरलेली कार, असा एकुण ४,९५,०००/-(चार लाख पंच्यान्नव हजार /-) रुपये किंमतीचा ऐवज पंचनाम्याने हस्तगत करुन रात्रीच्या वेळी घरफोडीचे दोन गुन्हे अत्यंत कमी वेळात, कौशल्याने व अविरत परीश्रमाने उघडकीस आणले आहेत. यातील आरोपी दिपक बाळासाहेब ढेरंगे याचेवर मारामारी, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र जवळ बाळगणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी दत्ता अरूण कदम याचेवर फसवणुक, खंडणी, अपघात यासारखे गुन्हे दाखल आहेत. यातील अटक आरोपी दिपक ढेरंगे व दत्ता कदम या दोघांवर यापूर्वी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (MCOCA) अंतर्गत अनुक्रमे अहिल्यानगर पोलीस व पुणे शहर पोलीस यांनी कारवाई केलेली आहे.
सदरची कामगिरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापुर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे/वि.शा.), राजन माने, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) तसेच अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर सपोनि जे. व्ही गळवे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपुत, इम्रान जमादार, उमेश पवार, दिपक जाधव, मंजूनाथ मुत्तनवार, राजेश मोरे, अजय गुंड, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे तसेच सायबर पो.स्टे कडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड व रतिकांत राजमाने यांनी केली आहे.
