सोलापूर (प्रतिनिधी )
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वात शहर गुन्हे शाखेने अमली पदार्थ विरोधात मोठीद मदार कारवाई करत तब्बल १ कोटी ९० लाख रुपये किमतीचे ९५० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ जप्त केले आहेत. यासोबतच १० लाख रुपये किमतीची हुंडाई क्रेटा कार जप्त करण्यात आली असून
तब्बल २ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एका महिलेसह आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) गोहर हसन तसेच पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
गोपनीय माहितीवरून कारवाई दि. १२ मे २०२६ रोजी सकाळी शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांचे पथक सोलापूर शहरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस अंमलदार भारत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, मुस्लिम कब्रस्तान ते संगमेश्वर कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या असलेल्या एका हुंडाई क्रेटा कारमध्ये अमली पदार्थाचा साठा आहे.
माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित वाहनाला घेराव घातला. वाहनातील व्यक्तीची चौकशी केली असता त्याचे नाव रिजवान शब्बीर खान (वय २६, रा. अंबिका नगर भाग-३, नई जिंदगी, सोलापूर) असे असल्याचे निष्पन्न झाले.कारच्या ड्रॉवरमध्ये सापडली एमडी पावडर
वाहनाची झडती घेतली असता ड्रायव्हिंग सीटच्या डाव्या बाजूच्या ड्रॉवरमध्ये राखाडी रंगाच्या प्लास्टिक पिशवीत पांढऱ्या रंगाचा स्फटिक स्वरूपातील पदार्थ आढळून आला. चौकशीदरम्यान हा पदार्थ एमडी (मेफेड्रोन) असल्याची कबुली आरोपीने दिली.
त्यानंतर फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी करण्यात आली असता सदर पदार्थ मेफेड्रोन असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार पंचनामा करून पुढील कारवाई केली.
अमली पदार्थ कुणाकडून आणला?
पोलिसांच्या चौकशीत आरोपी रिजवान खान याने हा अमली पदार्थ साहील सिकंदर फिरजादे (रा. सोलापूर) आणि अफजल मुर्शीद (रा. मुस्लिम कब्रस्तानजवळ, सोलापूर) यांच्याकडून मिळाल्याची माहिती दिली. तसेच हा साठा कारच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यात आल्याचेही सांगितले.या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७८/२०२६ नोंद करण्यात आला असून एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २१(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*दोन आरोपी अटकेत, महिलेचा सहभाग तपासात*
या प्रकरणात पोलिसांनी रिजवान शब्बीर खान (वय २६, नई जिंदगी, सोलापूर) साहील सिकंदर फिरजादे (वय २५, अलमश अपार्टमेंट, मंत्रीचंद नगर, सोलापूर)
यांना अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, तपासादरम्यान साहील फिरजादे याची पत्नी कायनात साहील फिरजादे उर्फ कायनात साहील खान (वय ३०) हिचा सहभाग असल्याची माहिती समोर आली असून तिचा शोध सुरू आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, भारत पाटील, सिद्धराम देशमुख, अनिल जाधव, महेश शिंदे आणि संजय साळुंखे यांनी पार पाडली.

