मोहोळ (अमर पवार ) तहसील कार्यालयातील वाळूज–देगाव येथील फेरफारची सहा पुस्तके गायब झाल्याच्या गंभीर आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणातील लिपिक आरोपी सिताराम कोळी (रा. अकोले, ता. मंगळवेढा ) यांना मोहोळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पी. एस. गोवेकर यांच्या न्यायालयाने पूर्णपणे निर्दोष मुक्त केले.
प्रकरणाचा पार्श्वभूमी:
सन २०१३ रोजी दाखल झालेल्या तक्रारीनुसार आरोपी कोळी हे तहसील कार्यालयातील अभिलेख विभागात लिपीक म्हणून कार्यरत असताना, वाळूज–देगाव या या गावातील फेरफारची सहा पुस्तके गहाळ केली आणि त्यांच्या जागी खोटी नोंद करून दस्तऐवज बोगस पद्धतीने गायब केल्याचा आरोप होता. या संदर्भात त्यांचेवर भा.दं.वि. कलम ४०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अभियोग पक्षाकडून दाखल झालेल्या आरोपपत्रात दावा करण्यात आला होता की आरोपीने सहा फेरफार पुस्तके अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविल्याची बनावट नोंद केली व फेरफार क्र. १०८४ ची खोटी छायांकित प्रत देण्यात आली.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान अभियोग पक्षाने एकूण चार साक्षीदार तपासले.
मात्र आरोपीचे वकील श्री. गौरंग काकडे यांनी साक्षीदारांचा व तपासी अधिकाऱ्यांचा अत्यंत तपशीलवार आणि अभ्यासपूर्ण उलटतपास घेतला.असा युक्तिवाद मांडला की, आरोपीकडे आरोपित दिवशी रेकॉर्ड रूम चा कार्यभार होता याचा कागदोपत्री पुरावा त्यांच्या तपासात नव्हता . ही सर्व बाब आरोपीच्या बचावाला निर्णायक ठरली. साक्षीदारांच्या उलटतपासामुळे अभियोग पक्षाच्या दाव्यांतील विसंगती उघडकीस आल्या, मुख्य पुराव्यासंदर्भात अभियोग पक्ष पूर्णपणे अपुरा ठरला.
आणि “अभियोग पक्षाने मांडलेले आरोप संशयापलीकडे सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहेत.”असे मत न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्टपणे नमूद केले.न्यायालयाने भा.दं.वि. कलम ४०९ अंतर्गत ठेवलेल्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता जाहीर केली. यात आरोपी तर्फे ॲड. गौरंग पां. काकडे यांनी तर सरकार पक्षांतर्फे सहा. सरकारी अभियोक्ता ॲड. डी . पी. गाढवे यांनी काम पाहिले.
