सोलापूर (प्रतिनिधी ) व्यसन आणी
मौजमजेकरिता पैशांची गरज भागवण्यासाठी बीड येथील दोन विधिसंघर्षग्रस्त मुलांनी सोलापुरात येऊन दुचाकीवरून मणिमंगळसूत्र चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या दोन दिवसांत हा गुन्हा उघड करत त्या मुलांकडून मणिमंगळसूत्र, दुचाकी व दोन मोबाईल असा पाच लाख ५८ हजार ५८८ रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
मंगळवारी (ता. ७) सायंकाळी अवंती नगरात मैत्रिणींसह पायी निघालेल्या विजयालक्ष्मी धोंडीराम सावळे (वय ६६, रा. अवंती नगर, मुरारजी पेठ) यांच्या गळ्यातील सुमारे ३३ ग्रॅम सोन्याचे मणिमंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेले होते.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी व्यसन आणि मौजमजेसाठी पैशांची गरज असल्याने सोलापुरात येऊन चोरी केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी तसेच चोरीस गेलेले मंगळसूत्र पोलिसांनी जप्त केले आहे. या कारवाईत एकूण सुमारे ५ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
यात हवालदार बसवेश्वर परीट, नाईक शिवानंद भिमदे, कॉन्स्टेबल विनोद व्हटकर, विनोदकुमार पुजारी, कृष्णा बडुरे, सुरज सोनवलकर, अमोल खरटमल, शशिकांत दराडे, अयाज बागलकोट, अजय चव्हाण, विनायक जाधव, पंकज घाडगे, सुधाकर माने
रवी धेंडे, अतिश पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड, नितीन मोरे, तौसिफ शेख यांचा समावेश होता.
*सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपासामुळे चोरटे जाळ्यात*
घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान हे दोघेही बीड जिल्ह्यातील अल्पवयीन असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार तेथे जाऊन अवघ्या दोन दिवसांत गुन्हा उघडकीस आणून मुद्देमाल मिळवून दिला.
