सोलापूर (प्रतिनिधी ) जिल्हा न्यायालयात वकिली करणाऱ्या एका वकिलावर शुक्रवारी (ता. १०) वाहतूक पोलिसांनी 'ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह'ची कारवाई केली. त्याला वाहतूक पोलिसांनी १० हजार रुपयांचा दंड'केला आहे. शुक्रवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास वाहतूक पोलिसांनी गांधी नगर चौकात कारवाई केली आहे.
कारवाईवेळी गाडीत ३० हजार रुपये होते असे वकील म्हणू लागला. त्यावेळी पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. त्यावेळी त्याच्याकडे अवघे १३ रुपये निघाले. पोलिसांनी सावध भूमिका घेत कारची झडती घेताना व्हिडिओ शुटिंग
केले होते. दरम्यान, पोलिसांनी त्या वकिलाची चारचाकी (एमएच १३, सीके २५१८) गाडी जप्त केली आहे. मद्यपान केलेल्या वकिलास समजावून सांगत वाहतूक पोलिस निरीक्षक रविंद्रनाथ भंडारे यांनी रिक्षात बसवून घरी पाठविले. तत्पूर्वी, महिला वाहतूक अंमलदारांनी वकिलाची गाडी अडविली. त्यावेळी वकील कायद्याची भाषा वापरत हुज्जत घालत होता. त्यावेळी महिला अंमलदाराने अधिकाऱ्यांची मदत मागितली होती. पोलिसांनी त्यांना वाहतूक कायद्यातील कलम २०७ ची नोटीस दिली आहे. सध्या गाडी पोलिसांत जप्त असून अद्याप वकील पोलिसांकडे आलेला नाही. त्याच्यावरील खटला वाहतूक पोलिसांनी तयार केला असून तो आता न्यायालयात पाठविला जाणार आहे.
