Type Here to Get Search Results !

अवघ्या ६ तासांत जबरी चोरीचा पर्दाफाश; मंद्रूप पोलिसांची धडाकेबाज कारवाई. सिने-स्टाईल पाठलाग करून दोन आरोपी जेरबंद; तिसऱ्याचा शोध सुरू




सोलापूर (प्रतिनिधी ) दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या सहा तासांत उलगडा करत मंद्रूप पोलिसांनी चपळ व धाडसी कारवाईचे दर्शन घडवले. सिने-स्टाईल पाठलाग करत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांबद्दल विश्वास वाढला असून गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ एप्रिलच्या रात्री आयशर टेम्पोमधून मालवाहतूक करत असताना मळसिद्धप्पा मंदिर परिसरात तीन अज्ञात इसमांनी वाहन अडवून जबरदस्तीने थांबवले. त्यानंतर चालकाला मारहाण करून सुमारे २० हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले.

या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शंकर पटवारी यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले.

त्याअनुसार पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे, सहायक फौजदार बापू शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल माजिद शेख, संदीप काळे तसेच चालक श्रीशैल शिवणे यांच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला.

यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने कारवाई करत थरारक पाठलाग करून मंद्रूपमधील दोन आरोपींना अटक केली. अटक आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे करीत आहेत.

दरम्यान, नांदणी येथे आरटीओ कर टाळण्यासाठी मंद्रूप-कुरघोट मार्गे जड वाहनांची वाढती वाहतूक होत असल्याने काही तरुणांकडून वाहनचालकांची लूटमार वाढत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे.

         मंद्रूप पोलिसांचे कौतुक 

अल्पावधीत गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना अटक केल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे, सहायक फौजदार बापू शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल माजिद शेख, संदीप काळे व चालक श्रीशैल शिवणे यांच्या पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.