सोलापूर (प्रतिनिधी )
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लोकशाही फाउंडेशन, सोलापूर यांच्या वतीने बेगम पेठ येथील महानगरपालिका मुलांची उर्दू केंद्र शाळा क्रमांक 1 चे 100 आणि महानगरपालिका उर्दू केंद्र मुलींची शाळा क्रमांक 5 चे 80 अशा एकूण 180 विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मा वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये सर्व 180 विद्यार्थ्यांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 20 विद्यार्थ्यांना चष्म्याची गरज असल्याचे निदर्शनास आले असून या सर्व विद्यार्थ्यांना लवकरच लोकशाही फाउंडेशनच्या वतीने मोफत चष्मे वितरित करण्यात येणार आहेत.
या शिबिराचे उद्घाटन जेल रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत साहेब यांच्या हस्ते सोमवारी सकाळी 11 वाजता करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक रियाज बागवान, लोकशाही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व नेत्रतज्ञ वसीमराजा बागवान, ॲड. मुबीन बागवान तसेच शाळेच्या प्राचार्या माशाळकर, नसरीनबानो, अल्ताफ सुरंजी आणि तौसीफ शेख उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना संस्थापक अध्यक्ष वसीमराजा बागवान यांनी सांगितले की, लहान मुलांमध्ये डोळ्यांच्या नंबरची समस्या वाढत आहे. सुरुवातीला -0.25 किंवा -0.5 असा कमी नंबर असल्यास वेळेवर ब्लू फिल्टरचा चष्मा वापरल्याने 2 ते 3 महिन्यांत तो नियंत्रणात येऊ शकतो. मात्र वेळेत उपचार न केल्यास नंबर वाढून पुढे आयुष्यभर चष्मा लावावा लागू शकतो.
लोकशाही फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून विविध शाळा व वस्त्यांमध्ये जाऊन मोफत नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करत आहे. संस्थेचा उद्देश केवळ उपचार करणे नसून विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे.
