Type Here to Get Search Results !

अवैध गॅस वापरणाऱ्यांवर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांची धडक कारवाई 09 सिलिंडर जप्त




​सोलापूर (प्रतिनिधी ) आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच, सोलापूरचे अन्नधान्य वितरण अधिकारी (FDO) ओंकार पडोळे पुन्हा एकदा 'ॲक्शन मोड'वर आले आहेत. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सायंकाळी शहरातील चौपाटी परिसरात धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, ९ सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.


​आसार मैदान परिसरात मध्यरात्रीपर्यंत कारवाई


​मिळालेल्या माहितीनुसार शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने आणि अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आसार मैदान (सावरकर मैदान) येथील चौपाटी आणि किल्ला बागेच्या बाजूला असलेल्या चायनीज गाड्या व पावभाजी सेंटरवर अचानक धाडी टाकल्या. या तपासणीत ९ घरगुती सिलिंडर व्यावसायिक कारणांसाठी वापरले जात असल्याचे उघड झाले. पथकाने हे सर्व सिलिंडर जागीच जप्त केले असून, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


*​जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारींचा ओघ; ४ दिवसात ४० तक्रारी*


​सोलापूरचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी रुजू होताच नागरिकांनी गॅस एजन्सींच्या मनमानी कारभाराविरुद्ध तक्रारींचा पाढा वाचला आहे. प्रशासनाच्या आपत्कालीन हेल्पलाईनवर अवघ्या चार दिवसांत गॅस एजन्सींच्या विरोधात ४० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना ई-केवायसी (e-KYC) बाबत मार्गदर्शन केले असून, दुसरीकडे पुरवठा विभागाने अवैध वापर रोखण्यासाठी कंबर कसली आहे.


​या धडक मोहिमेत प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेचा मोठा ताफा सहभागी होता:

​पुरवठा विभाग: परिमंडळ अधिकारी राजेश यमपुरे (ब विभाग), नंदकिशोर ढोके (अ विभाग), प्रफुल नाईक (ड विभाग), पुरवठा निरीक्षक ज्ञानेश्वर काशीद, सज्जन भोसले, गीता डंके, वैभव मोरे, सचिन लांडे, आनंद मधणे.

​पोलीस प्रशासन: पोलीस अंमलदार जावेद जमादार, आबाजी सावळे, धीरज सातपुते, विठ्ठल यलमार.

 

घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणे हा कायद्याने गुन्हा आहे. आखाती युद्धासारख्या जागतिक परिस्थितीमुळे इंधनाचा काळाबाजार किंवा अवैध वापर खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.