सोलापूर (प्रतिनिधी ) दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेळी चोरीच्या घटना वाढत असून, चोरटे पोलिसांनाच खुलेआम आव्हान देत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. १८ मार्च रोजी चंपाबाई गंचिनगोटे यांच्या शेतातून शेळी चोरीची घटना घडली होती. मात्र, घटनेला अनेक दिवस उलटूनही पोलीस केवळ चौकशीच करत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणात चोरांचा माग काढण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे “चोर शिरजोर आणि पोलीस कमकुवत” अशी चर्चा गावात रंगू लागली आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत होत आहे.
गावकऱ्यांनी याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करत, मंद्रूप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी शंकर पटवारी यांनी स्वतः लक्ष घालून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. “चोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या नाहीत, तर अशा घटना वाढत जातील,” असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी वर्गात असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. काही ठिकाणी नागरिक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंद्रूप परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. अन्यथा परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
