Type Here to Get Search Results !

चिमुकलीच्या खुनाचा छडा लावणाऱ्या पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या तपासाला राज्यस्तरीय 'सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी'चा मान




नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात घडलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीच्या निघृण खून प्रकरणाचा छडा लावत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा मिळवून देणाऱ्या कल्याणचे पोलीस उपायुक्त तथा तत्कालीन नाशिकचे पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे यांच्या तपासाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. या गुन्ह्याची निवड 'सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी बक्षिसा'साठी करण्यात आली असून तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांना २५ हजार रुपयांचे बक्षीस आणि प्रशस्तीपत्र जाहीर करण्यात आले आहे.


३१ मे २०१८ रोजी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील आवली दुमाला येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. घराच्या ओट्यावर खेळत असलेल्या पाच वर्षांच्या मुलीला आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवून उचलून नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलगी मोठ्याने रडू लागल्याने गावकऱ्यांना संशय येईल या भीतीने आरोपीने तिच्या डोक्यात दगड मारून तसेच गळा दाबून तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मुलीचे प्रेत झाडाखाली खड्डा करून पुरले होते.या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात खून, अपहरण व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची जबाबदारी तत्कालीन डीवायएसपी अतुल झेंडे यांच्याकडे सोपविण्यात आली.


झेंडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. वैज्ञानिक तपास पद्धतीचा वापर करत मुलीच्या अवशेषांमधून मिळालेल्या हाडांचे नमुने आणि आई-वडिलांचे डीएनए नमुने तपासासाठी पाठविण्यात आले. या अहवालांवर आधारित भक्कम पुरावे उभे करत आरोपीला अटक करण्यात आली. पुढील न्यायालयीन सुनावणीत सादर करण्यात आलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे जिल्हा न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

या संवेदनशील प्रकरणात काटेकोर तपास करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याबद्दल पोलीस अधीक्षक, कायदा व संशोधन, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने या गुन्ह्याची 'सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी बक्षिसा'साठी निवड करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.