सोलापूर (प्रतिनिधी ) बेकायदा दारू विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध मंद्रूप पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला एक लाख ५२ हजार ६६१ रुपयांचा अवैध देशी, विदेशी आणि हातभट्टी दारूचा साठा आज (२८ फेब्रुवारी) पंचांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला.
सोलापूर न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया पार पडली. सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबवण्यात आली. विविध गुन्ह्यात
जप्त केलेल्या ९० मि.ली., १८० मि.ली. च्या शेकडो बाटल्या, नामांकित ब्रँड्सची विदेशी दारू आणि हजारो लिटर हातभट्टी दारू असा साठा पोलिस ठाणे परिसरातील एका खड्ड्यात
ओतून पंचांसमोर तो फोडून नष्ट करण्यात आला. या वेळी पोलिस उपनिरीक्षक राज डांगे, सहाय्यक फौजदार पाटील आणि महिला पोलिस कॉन्स्टेबल कांबळे यांनी ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.
