सोलापूर (प्रतिनिधी ) दक्षिण तालुक्यातील बरूर येथे कार्यरत असलेल्या श्री आदिशक्ती फायनान्स संस्थेकडून ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मंद्रूप पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 44/2026 नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी निर्मला गणेश चौगुले (वय ५०, रा. बरूर ता. दक्षिण सोलापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सन २०२० ते २०२३ दरम्यान आरोपी प्रकाश मुकुंदा इटकर (मयत) व संजय प्रकाश इटकर (दोघे रा. बरूर) यांनी श्री आदिशक्ती फायनान्स संस्था स्थापन करून ठेवीदारांना वार्षिक २४ टक्के आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवले. पिग्मी व रोख स्वरूपात मुदत ठेवी स्वीकारून एकूण ४८ ठेवीदारांकडून १,११,१७,६३० रुपये जमा करून घेतले. मात्र, मुदत पूर्ण होऊनही ठेवीची रक्कम व व्याज परत न देता विश्वासघात व अपहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय दंड संहिता १९६० चे कलम ४१८, ४२०, ४०६, ३४ तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम ३९ आणि महाराष्ट्र ठेवीदारांचा (वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम १९९९ चे कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.
