सोलापूर (प्रतिनिधी) पोलिस असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला असून सुमारे ३ तोळे वजनाची व अंदाजे ४ लाख ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन लंपास करणाऱ्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रविंद्र शंकर देशमुख (वय-६५ वर्षे, रा.वांगी नं.१, ता.करमाळा जि.सोलापूर) हे दि. २० जून २०२४ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून करमाळा ते वांगीकडे जात होते. खडकेवाडी फाट्याजवळील पेट्रोल पंपाजवळ चार अनोळखी इसमांनी त्यांना अडवले.या इसमांनी आपण पोलिस असल्याची बतावणी करून देशमुख यांना पुढे-मागे केले व “तुमच्या जवळील सोन्याचे दागिने पिशवीत काढून ठेवा” असे सांगितले.भीतीपोटी फिर्यादी यांनी गळ्यातील सोन्याची चैन काढून पिशवीत ठेवली.त्यानंतर आरोपींनी ती पिशवी घेत मोटारसायकलवरून पलायन केले.
या प्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४७९/२०२४ भा.दं.सं. कलम ३७८(४), २०४, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवून त्याचे बारकाईने परीक्षण करण्यात आले. तांत्रिक तपासाच्या आधारे खालील आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत
१.जहीर अब्बास अली शेख (रा. शिवाजीनगर पखवाज वेज, जि.बीड)
२.अली मिर्झा दवेश (रा. शिवाजीनगर पखवाज वेज, जि. बीड)
३.लाला समीर जाफर शेख (रा. आंबिवली, कल्याण, जि. ठाणे ४. जाफर आलम सय्यद (रा. आंबिवली, कल्याण, जि. ठाणे) वरील
आरोपींना अटक करून पोलिस कोठडीत कसून चौकशी करण्यात आली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी जहीर अब्बास अली शेख (वय ४२) याच्याकडून फिर्यादी यांची अंदाजे ३ तोळे वजनाची व सुमारे ४.५० लाख रुपये किंमतीची सोन्याची चैन हस्तगत करण्यात आली आहे. सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी (भा.पो.से.) अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यादवकर व उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार पावरे व त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुशीलकुमार पावरे करीत आहेत.
नागरिकांना आवाहन
पोलिस असल्याचे सांगून कोणीही अनोळखी व्यक्ती दागिने काढण्यास सांगत असल्यास तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
