सोलापूर (प्रतिनिधी ) पंढरपुरातील कुंभार गल्लीतील माय-लेकाच्या दुहेरी हत्याकांडाचा तब्बल सात महिन्यांनंतर झालेला उलगडा हा एखाद्या गुन्हेगारी चित्रपटालाही मागे टाकणारा ठरला आहे. “साहेब, आमच्या गल्लीत खून झालाय” असा घाबरलेल्या आवाजात पोलिसांना फोन करणारा आणि तपासासाठी विविध सल्ले देणारा व्यक्तीच या खुनाचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करत एका अल्पवयीन मुलासह तिघांना अटक केली आहे.
१५ जुलै २०२५ रोजी सुरेखा संजय जगताप (४५) आणि त्यांचा मुलगा लखन संजय जगताप (२४) यांचा त्यांच्या राहत्या घरात निर्घृणपणे खून करण्यात आला होता. सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी कोणताही ठोस पुरावा किंवा प्रत्यक्ष साक्षीदार नसल्याने तपासाला सुरुवातीपासूनच मोठे आव्हान होते. दरम्यान, खुनाची माहिती देणारा एक तरुण वारंवार पोलिस ठाण्यात येऊन तपासाची दिशा सांगण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला तो मदत करत असल्याचा भास होत असला, तरी त्याच्या हालचाली आणि वक्तव्यांतील विसंगतीमुळे पोलिसांचा संशय बळावला.
तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण, मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयितांच्या हालचालींवर गुप्त पाळत ठेवण्यात आली. अखेर पोलिसांनी राजस्थानमधील जोधपूर येथून एक आरोपी ताब्यात घेतला, तर अन्य दोघांना पंढरपूरमधून अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असून, त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात वैयक्तिक हेवेदावे, प्रेमप्रकरण किंवा अनैतिक संबंधातून हा दुहेरी खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोपींनी गुन्ह्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बनावट माहिती देणे, घटनास्थळी गोंधळ निर्माण करणे आणि स्वतःवर संशय येऊ नये म्हणून तपासात सक्रिय असल्याचे नाटक करणे अशा विविध क्लृप्त्या केल्याचे समोर आले आहे. मात्र पोलिसांच्या संयमित आणि तांत्रिक तपासामुळे अखेर सत्य बाहेर आले.
ही संपूर्ण कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीचे शहरात कौतुक होत असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. सात महिन्यांनंतर उलगडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने पंढरपूरकरांना हादरवून सोडले होते सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
