Type Here to Get Search Results !

ही कसली स्मार्ट सिटी? पर्यावरण पायदळी तुडवत धूर कचऱ्यात हरवली नूतन महापौरांची मिरवणूक; उपमहापौरांनी जपला पर्यावरणाचा वसा.




सोलापूर (प्रतिनिधी) नूतन महापौर व उपमहापौर यांनी आपले व्हीजन व्यक्त करताना शहर स्वच्छ व प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. निवडीनंतर नूतन महापौरांची मिरवणूक धूर-कचऱ्यात हरवली आणि उपमहापौरांनी मात्र पर्यावरणाचा वसा जपत मिरवणुकीला फाटा दिला. पालकमंत्री गोरे उपमहापौर कक्षात आल्यानंतर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकते यांनी रोप भेट देऊन स्वागत केले.


सभागृहासमोर दुपारी १२ ते ३ या कालावधीत तब्बल तीन तास सलग फटाकेबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट आणि जेसीबीमधून गुलालाची उधळण करीत ध्वनी व वायू प्रदूषणाचा कहर पाहायला मिळाला. फटाक्यांच्या धुरामुळे महापालिका आवारात धुराचे लोट पसरले होते. श्वास घेणेही अवघड झाल्याने अनेक अधिकारी, कर्मचारी तसेच काही कार्यकर्त्यांना तोंडाला रुमाल बांधून बाहेर

पडावे लागले. महापालिका परिसर आणि वाहनेही गुलालामध्ये न्हाहून गेले होते. स्वच्छ शहर, सुंदर शहर, प्रदूषणमुक्त शहरासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा संकल्प करणारे महापौर विनायक कोंड्याल यांनी पहिल्या दिवशी संकल्प मोडीत काढले. ही विरोधाभासी कृती चर्चेचा विषय ठरला नसता तरच नवल.

दरम्यान,नूतन महापौरांच्या मिरवणुकीत वा त्यांच्या कोणत्याच जल्लोषात सहभागी न होता उपमहापौरांनी मात्र पर्यावरणपूरक भूमिका घेत संयमित पद्धतीने स्वागत स्वीकारत पर्यावरणाचा वसा जपण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. निवडीनंतर त्यांनी ना फटाके फोडले, ना गुलाल उधळला, ना फटाके फोडून प्रदूषण वाढविले. महापालिकेतून घरी जाताना त्यांनी कै. आप्पासाहेब वारद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साध्या पद्धतीने घरी गेल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.