सोलापूर (प्रतिनिधी )
गेल्या चार वर्षांपासून कुर्डू (ता. माढा) परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या "मोका "सारख्या गुन्ह्यातील कुख्यात दरोडेखोरास स्थानिक गुन्हे शाखेने भीरा भाईंदर परिसरात जेरबंद केले. त्याच्याविरुद्ध जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १७ तर कर्नाटकातील सीमाभागातील चडचण (जि. विजयपूर) पोलिसांत दोन असे १९ गुन्हे दाखल आहेत. त्यात खून, दरोडा, जबरी चोरी व सरकारी कामात अडथळा अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.
कुकण ऊर्फ कृष्णा काळूराम शिंदे (रा. कुर्डू ता. माढा) असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने १८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. आता तो न्यायालयीन कोठडीत असून कुर्दुवाडी पोलिसांकडील मोका प्रकरणात त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे
कृष्णा हा परिसरात लूटमार करणे, लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन पैसे उकळणे यासारखे गुन्हे करत असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकाने माहिती घेतली असता तो नालासोपारा, वसई विरार येथे गेल्याची खबर मिळाली. त्यावरून तांत्रिक विश्लेषण केल्यावर तो सध्या नालासोपारा परिसरातील धानीवबाग येथे असल्याचे आढळले. त्यानुसार पथकाने १२ तास सापळा लावून त्याला जेरबंद केले.
पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे, फौजदार श्रीकांत गायकवाड, हेडकॉन्स्टेबल सलीम बागवान, रवी माने, आबा मुंढे, सायबरचे व्यंकटेश मोरे, अश्विनी गोटे, सूरज रामगुडे, विनायक घोरपडे, अन्वर आतार, मनोज राठोड, समीर शेख यांच्यासह मीरा भाईंदर पोलिस आयुक्तालयाकडील पोलिस निरीक्षक बडाख, पोलिस अधिकारी प्रशांत गांगुर्डे दत्ता सरख, अंमलदार शिवाजी पाटील संदीप शेरमले, रवींद्र कांबळे, धनंज चौधरी यांनी ही कारवाई केली.
