सोलापूर (प्रतिनिधी) दिनांक 28/1/2026 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या भीषण घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या अपघातात अजितदादांसह त्यांच्यासोबत सावलीसारखे वावर करणारे त्यांचे खाजगी सुरक्षा रक्षक (PSO) विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला आहे. कर्तव्यावर असताना काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने पोलीस दलात आणि त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.विदीप जाधव
विदीप जाधव हे मुंबई पोलीस दलातील एक कर्तव्यनिष्ठ कर्मचारी होते. मुंबई पोलीस दलातील २००९ च्या बॅचचे कर्मचारी होते. त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे आणि शिस्तीमुळे त्यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षा ताफ्यात करण्यात आली होती ते ठाण्यातील कळवा (विटावा) परिसरातील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक १४ वर्षांची मुलगी आणि ९ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.
विदीप जाधव हे नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ६.३० च्या सुमारास कामावर जाण्यासाठी घरातून उत्साहाने निघाले होते. "दादा" म्हणून ओळखले जाणारे विदीप अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते,
अजित पवार हे मुंबईहून बारामतीला एका खाजगी विमानाने (Bombardier Learjet 45) निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे पीएसओ विदीप जाधव, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी आणि दोन पायलट होते. बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाला भीषण अपघात झाला आणि त्याला आग लागली. या दुर्घटनेत विदीप जाधव यांच्यासह विमानातील सर्व ५ जणांचा मृत्यू झाला.
अजितदादांच्या प्रत्येक दौऱ्यात, सभेत आणि गर्दीत त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणारे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे विदीप जाधव हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलाने एक धाडसी जवान गमावला आहे. पोलीस कर्मचारी विदीप जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटूंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मोठया प्रमाणात मदत मिळावी त्यांच्या लहान मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च राज्य सरकार ने करावा त्याच बरोबर पोलीस कर्मचारी विदीप जाधव यांच्या कुटूंबातील सदस्यांना पोलीस सेवेत सामावून घेणे बाबत पोलीस मित्र परिवार वतीने सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले
यावेळी यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे शहर अध्यक्ष अंबादास गज्जम कलीम शेख अमोल कुलकर्णी अतुल भडंगे सतीश गडकरी इत्यादी उपस्थित होते.
