सोलापूर ( प्रतिनिधी )
सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशनने ऑनलाईन आर्थिक फसवणुकीतील तीन वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य सूत्रधाराला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. परदेशात लाओस येथे वास्तव्यास राहून चायनीज व मलेशियन साथीदारांच्या मदतीने लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या ग्लेन (अल्बर्ट) पर्सी सिक्वेरा (वय 47, रा. पलावा सिटी, डोंबिवली) याला लुक आऊट नोटीसच्या आधारे Sardar Vallabhbhai Patel International Airport, अहमदाबाद येथून 9 फेब्रुवारी 2026 रोजी ताब्यात घेण्यात आले. न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
62.65 लाखांची ऑनलाईन गुंतवणूक फसवणूक
सायबर पोलीस स्टेशन गुन्हा क्र. 04/2024 अन्वये भादंवि कलम 420, 419, 34 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (C) (D) अंतर्गत 4 जुलै 2024 रोजी गुन्हा दाखल झाला होता.
फिर्यादींशी ऑनलाईन संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये 10 ते 300 टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यातून तब्बल 62 लाख 65 हजार रुपये विविध खात्यांमध्ये व डिजिटल करन्सी (USDT) वॉलेटद्वारे वळवण्यात आले.
तपासात उघड झाले की –
AL Hareem Hajij Umrah Services खात्यात ₹16.60 लाख
Blackseed Solutions and Service खात्यात ₹10.39 लाख
ही रक्कम डिजिटल करन्सीद्वारे ट्रान्सफर करण्यात आली होती.
लाओसमधून रचला जात होता आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेट
मुख्य आरोपी ग्लेन सिक्वेरा हा 2022 पासून लाओस येथे वास्तव्यास होता. तेथे चायनीज “टिचर” नावाने ओळखल्या जाणाऱ्या फसवणूकदारासोबत संगनमत करून विविध देशांतील युवकांना “ऑफिस बॉय” व “डेटा एंट्री जॉब”च्या नावाखाली बोलावले जात होते.
परदेशात पोहोचल्यानंतर त्यांचे पासपोर्ट जप्त करून जबरदस्तीने ऑनलाईन फसवणुकीचे काम करून घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नोटीस बजावूनही आरोपी हजर न झाल्याने 2024 मध्ये त्याच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. इमिग्रेशन विभागाच्या मदतीने त्याचा मागोवा घेऊन अखेर अहमदाबाद विमानतळावर कारवाई करण्यात आली.
इतर राज्यांतही गुन्हे दाखल
सहआरोपी तन्वीर याकुब चौगुले (रा. मुंब्रा, ठाणे) याच्याविरुद्ध वापरलेल्या बँक खात्यांवरून महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर, चंद्रपूर, नंदुरबार तसेच इतर राज्यांमधून एकूण 92 ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
तसेच तामिळनाडू राज्यातील Pudhukottai CB CID येथे भारतीय दंड संहिता कलम 420, 367, 371, 374, 109, 120(B) तसेच इमिग्रेशन अॅक्ट कलम 10 r/w 24(1)(B) अंतर्गत गुन्हा दाखल असून आरोपी परांगदा म्हणून नोंद आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
नागरिकांना सायबर पोलिसांचे आवाहन
सायबर पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की —
जादा नफ्याचे आमिष दाखवणाऱ्या ऑनलाईन जाहिरातींना बळी पडू नका.
कोणत्याही अनोळखी व्यक्तीस बँक खाते, पासबुक, एटीएम कार्ड, सिमकार्ड, ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका.
कमिशनच्या आमिषाने खाते उघडण्यास भाग पाडले जात असल्यास तत्काळ सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.
अशा प्रकारे आपल्या खात्याचा वापर करून गुन्हेगार इतर राज्यांतील लोकांची फसवणूक करतात आणि नकळत आपणही आरोपी ठरू शकता, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
