सोलापूर (प्रतिनिधी ) पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सात पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय सोयीसाठी बदल्या केल्या आहेत. त्यात मोहोळ, मंद्रूप, कामती, वेळापूर, माढा, नातेपुते पोलिस ठाण्यांचा समावेश आहे.
मोहोळ पोलिस ठाण्याचे प्रभारी हेमंत शेडगे यांची बदली पुणे ग्रामीणमध्ये झाली आहे. त्यामुळे मोहोळ पोलिस ठाण्याची जबाबदारी ग्रामीण पोलिसांच्या मानव संसाधन शाखेचे बाजीराव पोवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर कामती पोलिस ठाण्याचे प्रभारी ज्ञानेश्वर उदार यांचीही बदली पुणे ग्रामीणमध्ये झाल्याने त्याठिकाणी सहायक पोलिस निरीक्षक बसवेश्वर जकिकोरे यांची बदली झाली आहे. मंद्रूप पोलिस ठाण्याचा पदभार आता पहिल्यांदाच पोलिस निरीक्षकांकडे देण्यात आला असून या पोलिस ठाण्याचा पदभार मंदिर सुरक्षा येथील शंकर पटवारी यांच्याकडे असणार आहे.
पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांच्याकडे वेळापूर पोलिस ठाण्याचा पदभार सोपविण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांच्याकडे नातेपुते पोलिस ठाणे, करमाळा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित शिंदे यांच्याकडे माढा पोलिस ठाण्याचा पदभार दिला आहे. वेळापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांची बदली स्थानिक गुन्हे
शाखेकडे करण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी सध्याचा कार्यभार सोडून तत्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे, असेही पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.
