Type Here to Get Search Results !

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ परिसरात 163 अन्वये कलम लागू -पोलीस उपायुक्त डॉ अश्विनी पाटील

 



सोलापूर (प्रतिनिधी ) केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ, नवी दिल्ली यांच्यामार्फत इयत्ता १० वी व इयत्ता १२ वीच्या परीक्षा दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ ते २७ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सदर परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्र परिसरात गैरप्रकार, दळणवळण साधनांचा गैरवापर तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व परीक्षार्थींना कोणताही अडथळा होऊ नये तसेच परीक्षा प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना आपली कर्तव्ये निर्विघ्नपणे पार पाडता यावीत, यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये आदेश लागू करण्यात आला आहे.


 डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा), सोलापूर शहर, मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आदेश देते की, दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ ते २७ मार्च २०२६ (सुट्टीचे दिवस वगळून) दरम्यान सकाळी ०९.०० वाजलेपासून ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत खालील परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील —


केंद्रीय विद्यालय, मोदी रेल्वे पुलाजवळ, जांबवीर चौक, केएलई इंग्लिश मिडीयम प्रशाला, नरसिंह नगर, डी-मार्टजवळ, जुळे सोलापूर, इंडियन मॉडेल स्कूल, सिंहगड पब्लिक स्कूल, केगांव या सर्व परीक्षाकेंद्रावरील केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाचे इयत्ता 12 वी व 10 वी च्या परीक्षा संपेपर्यंत परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात पुढील कृती करण्यास बंदी घालण्यात आली आहे.


• परीक्षा केंद्र परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे.

• सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण करणारे कृत्य करणे.

• परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स, फॅक्स, टायपिंग सेंटर, एसटीडी बूथ, ध्वनीक्षेपक, संगणक केंद्र, इंटरनेट कॅफे तसेच पानपट्टी आदी दळणवळण सुविधा कार्यरत ठेवणे.

• मोबाईल फोन, टॅबलेट, स्मार्ट वॉच, सेल्युलर फोन, वायरलेस सेट, कॅल्क्युलेटर, ट्रान्झिस्टर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधनांसह परीक्षा केंद्र परिसरात प्रवेश करणे.

• परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही वाहनास प्रवेश करणे.

• परीक्षा प्रक्रियेशी संबंधित नसलेली व्‍यक्ती उमेदवाराचे नातेवाईकासह परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात प्रवेश करणे.

• परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्‍ती एकत्र येणे.


सदरचा आदेश परीक्षा प्रक्रियेशी संबंधीत सर्व शासकीय अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवृंद, परीक्षार्थी पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, होमगार्ड यांना त्यांचे परीक्षेसबंधी कर्तव्य पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाही.


या आदेशाचा कोणी कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 233 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील असे पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा) सोलापूर शहर डॉ. अश्विनी पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.