सोलापूर (प्रतिनिधी) महानगरपालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेने अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर जोरदार धडक कारवाई करत चार स्वतंत्र गुन्हे उघडकीस आणले आहेत.
मा. पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार यांनी गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांना विशेष मोहिम राबवून अवैध मद्य व्यवसायावर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांनुसार गुन्हे शाखेच्या पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
पहिली कारवाई – हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा
दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की सलगरवस्ती पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे कवठे येथे शेतामध्ये गुळमिश्रीत अवैध हातभट्टी दारू तयार केली जात आहे. त्यानुसार कुमार ऊर्फ बाबू पांडुरंग चव्हाण यांच्या शेतावर छापा टाकण्यात आला.
या कारवाईत तब्बल १२८५ लिटर गुळमिश्रीत रसायन व ८० लिटर तयार हातभट्टी दारू, असा एकूण ५२,९७५ रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.
या प्रकरणी संजय गोपीचंद राठोड, कुमार ऊर्फ बाबू पांडुरंग चव्हाण व प्रियंका कुमार चव्हाण (सर्व रा. भोजप्पा तांडा, ता. उत्तर सोलापूर) यांच्याविरुद्ध सलगरवस्ती पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई – दुचाकीवरून दारू वाहतूक
दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी हॉटेल अॅम्बेसिडर ते प्रभाकर महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अमोल बाळासाहेब भोसले हा देशी-विदेशी दारूच्या बाटल्या विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.
कारवाईदरम्यान १,०३,६६० रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या व एक दुचाकी मोटारसायकल जप्त करण्यात आली.
या प्रकरणी अमोल बाळासाहेब भोसले (रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर) याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरी कारवाई – ऑटो रिक्षातून अवैध दारू विक्री
त्याच दिवशी गांधीनगर, अक्कलकोट रोड परिसरात नरेंद्र रामलू कोंडा हा ऑटो रिक्षातून अवैध दारूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली.
गुन्हे शाखेने सापळा रचून कारवाई करत १,३२,५०० रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या व एक ऑटो रिक्षा जप्त केली.
या प्रकरणी नरेंद्र रामलू कोंडा (रा. गांधीनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) याच्याविरुद्ध एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौथी कारवाई – रिक्षा स्टॉपजवळ विक्रीसाठी दारू
कर्णीक नगर येथील स्वतंत्र्य सैनिक रिक्षा स्टॉपजवळ संदिप विष्णू शिंदे हा दारू विक्रीसाठी नेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे यांच्या पथकाने कारवाई केली.
या कारवाईत १,१२,८८० रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या व एक मोटारसायकल जप्त करण्यात आली.
या प्रकरणी संदिप विष्णू शिंदे (रा. दहिटणे, सोलापूर) तसेच गोल्ड वाईन शॉप, अशोक चौक, सोलापूरचा मालक यांच्याविरुद्ध जेलरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त डॉ. अश्विनी पाटील (गुन्हे/विशेष शाखा), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, शैलेश खेडकर, पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी ही कारवाई यशस्वी केली.
महापालिका निवडणुकीदरम्यान शहरात अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्यासाठी अशाच प्रकारची कडक कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाने दिला आहे.

