मोहोळ (प्रतिनिधी)
मोहोळ तालुक्यात गोवंशाची अवैध तस्करी व वाहतूक करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी आणि निर्णायक कारवाई करत जोरदार दणका दिला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत संघटित गुन्हेगारीचे अत्यंत कडक कलम लावत या टोळीतील सात आरोपींना अटक करण्यात आली असून, या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दि. ५ जुलै २०२५ रोजी नरखेड (ता. मोहोळ) येथे गोमांस वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून एका जागरूक नागरिकाला आरोपींनी अडवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. “आमच्या गाड्यांची माहिती पोलिसांना का देतोस?” असे म्हणत शस्त्रांचा धाक दाखवून धमकावण्यात आले होते. या घटनेनंतर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
२६ गंभीर गुन्ह्यांचा इतिहास उघड
तपासादरम्यान पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या सखोल चौकशीत या टोळीवर यापूर्वीच २६ गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. गोवंश संरक्षण कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व सामान्य नागरिकांना धमकावून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले जात होते.
वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही टोळीच्या वर्तनात कोणताही बदल न झाल्याने अखेर पोलिसांनी या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १११ (२)(ब), (३), (४) – संघटित गुन्हेगारीचे कडक कलम वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
अटक करण्यात आलेले आरोप
दानिश लियाकत कुरेशी (वय २५)
महमदअली लियाकत कुरेशी (वय २४)
शहाबाज अबुतालीब कुरेशी (वय २७)
तौफिक अबुतालीब कुरेशी (वय ३२)
इरफान इकबाल कुरेशी (वय २७)
दस्तगीर कोंडाजी कुरेशी (वय २५)
अरबाज अफजल कुरेशी (वय २५)
(सर्व रा. कुरेशी गल्ली, मोहोळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर)
पोलीस प्रशासनाचा कडक इशारा
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, पीएसआय अजय केसरकर, अविनाश पाटील, रहीमान शेख, दयानंद हैंबाडे व त्यांच्या पथकाने** यशस्वीरीत्या पार पाडली.
गोवंश तस्करी, अवैध वाहतूक व संघटित गुन्हेगारीविरोधात पुढेही अशीच कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
