सोलापूर (प्रतिनिधी) सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध गावठी हातभट्टी दारू गाळणाऱ्या इसम व त्यांना मदत करणाऱ्या महिलांना अवैध गावठी दारूच्या व्यवसायापासून परावृत्त करून त्यांच्या करता स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांना इतर व्यवसाय सुरू करण्याकरिता उपाय योजना राबवून अवैध हातभट्टी दारू व्यवसायाकडे पुन्हा आकर्षित होऊ नये या उद्देशाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण पोलीस दल नेहमीच प्रयत्नशील असून
त्याच अनुषंगाने मुळेगाव व मोहळकर तांडा ता. दक्षिण सोलापूर येथील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे करिता त्या महिलांना शिलाईचा व्यवसाय सुरू करून देण्यात आला आहे. महिलांना शिलाई केंद्रासाठी आणखी शिलाई मशीनची आवश्यकता असल्याने तेथील महिलांनी पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचेकडे शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
त्यानुसार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे , सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांना शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या हस्ते दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनी मुळेगाव तांडा व मोहळकर तांडा येथील शिलाई केंद्रांना 26 अत्याधुनिक शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले आहे.
सदर वेळी प्रीतम यादवकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका पोलीस ठाणे, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम व बोऱामणी दुरक्षेत्र कडील पोलीस अमलदार उपस्थित होते. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक प्रीतम यादवकर, अपर पोलीस अधीक्षक संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिलाई मशीन उपलब्ध करून देणे करिता संजय जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका पोलीस ठाणे व सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी प्रयत्न केले आहेत.
