सोलापूर (प्रतिनिधी) सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील दोन सराईत गुन्हेगार आदित्य शैलेंद्र माने (वय २३, रा. न्यु थोबडे मळा, देगांव रोड) आणि समर्थ प्रविण कांबळे (वय २४, रा. आवसे वस्ती, आमराई) यांना गुन्हेगारी कारवाया थांबवण्यासाठी ‘एमपीडीए’ (Maharashtra Prevention of Dangerous Activities Act, 1981) अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे.
मा. पोलीस आयुक्त श्री. एम. राज कुमार यांनी आदित्य मानेविरुद्ध दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आणि समर्थ कांबळेविरुद्ध दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून, दोघांना येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले आहे.
🔹 आदित्य शैलेंद्र माने — शहरात दहशत माजवणारा सराईत
आदित्य माने हा गेल्या काही वर्षांपासून शहरात सातत्याने घातक शस्त्रांसह फिरत असून, इच्छापूर्वक दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून मारामारी करणे, जबरी चोरी, खंडणी मागणे, दगडफेक आणि धमकी देणे असे गंभीर गुन्हे तो साथीदारांच्या मदतीने करत होता.
त्याच्या विरोधात एकूण ५ गंभीर गुन्हे नोंद असून, नागरिकांमध्ये त्याची दहशत निर्माण झाली होती. सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या त्याच्या कृत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी यापूर्वी २०२१ मध्ये कलम ११० (ई)(ग) फौजदारी प्रक्रिया संहिता, २०२२ मध्ये कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम व २०२३ मध्ये एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. तरीही त्याने गुन्हेगारी सवय सोडली नाही.
🔹 समर्थ प्रविण कांबळे — तडीपार असूनही गुन्हे सुरूच
समर्थ कांबळे यानेही शहरात दहशत माजवत, घातक शस्त्रांसह गंभीर दुखापत, खंडणी, चोरी व दगडफेक यांसारखे गुन्हे केले आहेत. त्याच्याविरुद्ध चार गंभीर गुन्हे नोंद असून, तो २०२३ मध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१)(अ)(ब) अन्वये हद्दपार करण्यात आला होता. मात्र, आदेशाचे उल्लंघन करून त्याने पुन्हा गुन्हेगारी सुरू ठेवली.
🔹 कायदेशीर कारवाईचा धडाका
दोन्ही गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याचा निर्णय मा. पोलीस आयुक्त श्री. एम. राज कुमार यांनी घेतला. या कारवाईत डॉ. अश्विनी पाटील (उप-आयुक्त गुन्हे/विशा), विजय कबाडे (उप-आयुक्त परिमंडळ), राजन माने (सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे), प्रताप पोमण (सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग १), अरविंद माने (वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा), महादेव राऊत (वपोनि फौजदार चावडी), तसेच गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार तुकाराम घाडगे, विनायक संगमवार, सुदीप शिंदे, अक्षय जाधव व विशाल नवले यांनी सहभाग घेतला.
🔹 महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा धडाकेबाज मोड
सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सोलापुरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये अवैध व्यवसाय करणारे, सराईत गुंड, समाजविघातक घटक यांची यादी तयार करण्यात आली आहे. २०२५ मधील येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमपीडीए अंतर्गत अशाच कारवाया सुरू राहतील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
आजअखेर सोलापुर पोलीस आयुक्तालयातर्फे एकूण २० आरोपींना सार्वजनिक सुव्यवस्था बाधित केल्याबद्दल एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. गुंडोवालों जरा होशियार यहाँ कें हम हें राजकुमार ची पुन्हा शहरवासियांना प्रचिती.
