सोलापूर(प्रतिनिधी) दीड-दोन वर्षांपासून पोलिस ठाण्यांमध्ये पडून असलेला ९९८ किलो ५२६ ग्रॅम गांजा गुरुवारी (ता. १६) नष्ट करण्यात आला. महापालिकेच्या भोगाव येथील कचरा डेपोत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी
अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या उपस्थितीत तो मुद्देमाल जाळून नष्ट करण्यात आला. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या १२ पोलिस ठाण्यांच्या कारवायांमध्ये तो अमली पदार्थांचा साठा जप्त झालेला होता
मोहोळ, कामती, सोलापूर तालुका, बार्शी शहर, करमाळा, कुडुवाडी, टेंभुर्णी, मंगळवेढा, अकलूज, वैराग या पोलिस ठाण्यांनी तो मुद्देमाल जप्त केला होता. खूप वर्षांपासून तो पोलिस ठाण्यांमध्येच पडून असल्याने
अमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यासाठी अमली पदार्थ नाश समिती नेमली होती. समितीचा अहवाल आणि न्याय सहाय्यक वैद्यक प्रयोगशाळेचा अभिप्राय घेऊन न्यायालयाच्या परवानगीने तो मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. त्यावेळी शासकीय पंच राम निंबाळकर, शिवकुमार कांबळे उपस्थित होते.
तत्पूर्वी, त्या मुद्देमालाचे वजन करण्यात आले. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप, मुख्यालयाचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
