Type Here to Get Search Results !

सुशील कराडसह तिघांवर सोलापुरात गंभीर गुन्हा दाखल; खुनाचा प्रयत्न, पोक्सोसह १४ कलमांचा समावेश महिलेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांची कारवाई; न्यायालयीन लढ्यानंतर गुन्हा नोंद




सोलापूर : परळी येथील सुशील वाल्मिक कराड याच्यासह अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार या तिघांविरुद्ध सोलापूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, पोक्सो आणि अन्य गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेने केलेल्या तक्रारीनंतर आणि न्यायालयीन लढ्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा शून्य क्रमांकाने नोंदविला आहे. एकूण १४ गंभीर कलमांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.


महिलेच्या तक्रारीनुसार, तिचे पती सुशील कराड यांच्याकडे विपणन व्यवस्थापक आणि संगणक परिचालक म्हणून काम करत होते. महिलेने कर्जावर दोन वाहने घेऊन वाहतूक व्यवसाय सुरू केला होता. तसेच परळी वैजनाथ येथे भूखंड खरेदी केला होता. यावरून सुशील कराड याने तिच्या पतीला मारहाण केल्याचा आरोप आहे.


६ मे २०२४ रोजी कार्यालयात डांबून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली. तसेच वाहनांच्या चाव्या आणि कागदपत्रे काढून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर ७ मे रोजी सुशील कराड व त्याच्या साथीदारांनी घरात घुसून कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली आणि त्यांच्या नावावर असलेला भूखंड दुसऱ्याच्या नावे करण्यास भाग पाडल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.


१७ मे २०२४ रोजी सोने विकण्यास भाग पाडून त्यातून मिळालेली रक्कम सुशील कराड याने घेतली. तसेच कोऱ्या बाँडपत्रांवर, धनादेशांवर आणि कागदपत्रांवर सह्या घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनांनंतर महिला आणि तिचे कुटुंबीय जीव वाचवून सोलापूर येथे आले. मात्र, येथेही फोनवरून अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.


१५ जून २०२४ रोजी गोपी गंजेवार याच्यासह पाच ते सहा जण महिलेच्या सोलापुरातील निवासस्थानी आले आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी महिलेने सोलापूर पोलीस आयुक्त, बीड पोलीस अधीक्षक आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, सुरुवातीला गुन्हा दाखल झाला नसल्याचे महिलेचे म्हणणे आहे.


त्यानंतर महिलेने ॲड. विनोद सूर्यवंशी यांच्यामार्फत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात गुन्हा नोंदवून तपास करण्यासाठी अर्ज दाखल केला. मात्र, संबंधित अर्ज योग्य न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात दाखल करण्याचे निर्देश देत न्यायालयाने अर्ज परत केला. या आदेशाविरोधात महिलेने ॲड. रितेश थोबडे यांच्यामार्फत कोल्हापूर खंडपीठात अर्ज दाखल केला.


दरम्यान, उच्च न्यायालयातील अर्जाच्या सुनावणीपूर्वीच एमआयडीसी पोलिसांनी सुशील कराड, अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्याविरुद्ध शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल केला. त्यामुळे दीर्घकाळापासून न्यायासाठी प्रयत्न करणाऱ्या महिलेला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.


या प्रकरणात महिलेच्या वतीने ॲड. रितेश थोबडे आणि ॲड. विनोद सूर्यवंशी यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.