सोलापूर (प्रतिनिधी ) शहरातील सातही पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी (वरिष्ठ पोलिस निरीक्षक) हद्दीतील सर्व दुकाने, हॉटेल्स बंद झाल्यावरच घरी जावे. जास्तीत जास्त वेळ अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात थांबावे, असे आदेश पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी दिले. अधिवेशन काळात शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यादृष्टीने सर्वांनी सतर्क राहावे, अशा सूचनाही त्यांनी उपस्थितांना दिल्या.
नागपूरमध्ये ७ ते १८ डिसेंबरपर्यंत हिवाळी
अधिवेशन होणार आहे. या काळात शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यादृष्टीने सर्व अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात थांबावे. त्यांच्या हद्दीत 'क्युआर कोड' पेट्रोलिंग वाढवावे, रात्री बारानंतर पहाटे साडेचार वाजेपर्यंत प्रत्येक तासाला पोलिसांनी
गस्त घालावी. आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणताही अवैध व्यवसाय, धंदा सुरू असणार नाही, याची दक्षता घ्यावी. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट पाहून संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी. डायल '११२'वर आलेल्या कॉलला तत्काळ प्रतिसाद द्यावा, अशाही सूचना पोलिस आयुक्तांनी बुधवारी झालेल्या क्राईम मिटिंगवेळी सर्व पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. रेल्वे स्टेशन, विजापूर वेस अशा परिसरात गस्त वाढवावी. रात्री उशिरा ठिकठिकाणी थांबणाऱ्यांवर कारवाई करावी, असेही ते म्हणाले. दररोज होणारी आंदोलने, निदर्शने, मोर्चावरही लक्ष ठेवावे. विविध गुन्ह्यातील 'पाहिजे' (वॉन्टेड) व फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, असेही पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी म्हटलं आहे
