सोलापूर (प्रतिनिधी ) जिल्ह्यातील अवैध हातभट्टी व्यवसायाला आळा घालण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे धडक कारवाई केली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे आज, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अवैध हातभट्टी निर्मितीच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत हातभट्टी निर्मितीसाठी वापरला जाणारा कच्चा माल, चुली, लोखंडी बॅरल, प्लास्टिक बॅरलमध्ये भरलेले गूळमिश्रित रसायन तसेच अन्य साहित्य असा अंदाजे ५ लाख ४१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
अवैध हातभट्टी व्यवसायाचे अड्डे पुन्हा सुरू होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून JCB मशीनच्या सहाय्याने हातभट्टीचे अड्डे व तेथील साहित्य उद्ध्वस्त करून नष्ट केले. या कारवाईमुळे अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिस अधीक्षकांच्या आदेशानंतर संयुक्त कारवाई
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच अवैध हातभट्टी व्यवसायामुळे नागरिकांच्या आरोग्याला आणि सार्वजनिक सुरक्षेला निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल वी. कुलकर्णी यांनी अशा व्यवसायाविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-अंमलदारांनी संयुक्तपणे मुळेगाव तांडा येथे कारवाई केली.
हातभट्टीसाठी मोठ्या प्रमाणात साहित्य
छाप्यादरम्यान अवैध हातभट्टी निर्मितीसाठी वापरला जाणारा कच्चा माल, चुली, लोखंडी बॅरल, प्लास्टिक बॅरलमध्ये भरलेले गूळमिश्रित रसायन आणि हातभट्टी तयार करण्यासाठी आवश्यक असलेले इतर साहित्य आढळून आले. या सर्व मुद्देमालाची अंदाजे किंमत ₹५,४१,३०० असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कारवाईदरम्यान केवळ साहित्य जप्त करण्यापुरती कारवाई न करता हातभट्टी निर्मितीची ठिकाणेच JCBच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आली.
चार जणांवर गुन्हे दाखल
अवैध हातभट्टी तयार करण्याच्या उद्देशाने साहित्य बाळगल्याप्रकरणी चार सराईत हातभट्टी व्यावसायिकांविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील संबंधित कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयामार्फतही पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हद्दपार आणि MPDAचीही कारवाई होणार
अवैध हातभट्टी व्यवसाय, बनावट दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही अशाच प्रकारची कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अशा व्यवसायाला आळा घालण्यासाठी गरजेनुसार हद्दपार तसेच MPDAसारख्या प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाईचा वापर केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल वी. कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी जगन्नाथ पाटील, अविनाश घाटगे आणि शिवकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाईत सहभाग घेतला.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, संजय राठोड, विशाल मुळे, बालाजी कांबळे, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, पोलीस हवालदार देवकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व महिला-पुरुष अंमलदार सहभागी होते.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पोलीस उपनिरीक्षक राम निंबाळकर, समाधान शेळके, सुखदेव सिद, अंजली सरवदे, धनाजी पवार, सचिन शिंदे आणि विकास थोरात तसेच महिला व पुरुष जवानांनी संयुक्त कारवाईत सहभाग घेतला.
मुळेगाव तांड्यातील या कारवाईमुळे अवैध हातभट्टी व्यवसायाविरोधात ग्रामीण पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी काळातही अशा अड्ड्यांवर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
