सोलापूर (प्रतिनिधी ) नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी रात्रीच्या गस्तीवर भर दिला आहे. रात्री १० नंतर विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर, मोकळ्या मैदानात किंवा आडोशाला थांबणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी १० पथके तैनात केली जाणार आहेत. शहरातील चौकाचौकांत नाकाबंदीही केली जाणार आहे.
शहरात सुमारे ४०० नवरात्रोत्सव मंडळे आहेत. १८ ते २० ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गरबा व दांडिया खेळला जातो. या ठिकाणी महिला पोलिसांसह बंदोबस्त राहणार आहे. टवाळखोररांची मस्ती जिरवत त्यांना पोलिस ठाण्यात आणून कायदेशीर कारवाई केली जाईल.असा इशारा पोलीस उपायुक्त डॉ अश्विनी पाटील यांनी दिला आहे
५०० नवरात्रोत्सवासाठी होमगार्ड आणि राज्य राखीव पोलिस बलाची एक तुकडी मागविण्यात आली आहे. सातही पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहायक पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त रात्रगस्तीत सहभागी होणार आहेत. पोलिसांनी अडविल्यानंतर घराबाहेर फिरण्याचे ठोस कारण सांगावे लागणार आहे. अत्यावश्यक सेवांतील मेडिकल व हॉस्पिटल वगळता अन्य दुकाने रात्री १० नंतर सुरू ठेवता येणार नाहीत
विशेषतः टवाळखोरांचा वावर असलेल्या ठिकाणी पोलिसांचे लक्ष राहणार आहे. जर रात्री 10 नंतर विनाकारण कोणी फिरत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस उपायुक्त डॉ अश्विनी पाटील यांनी दिला आहे.
