सोलापूर (प्रतिनिधी ) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यासारख्या आव्हानात्मक परिस्थितीला भविष्यात प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गोळीबार कौशल्य अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या संकल्पनेतून राज्यभर विशेष गोळीबार प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे.
इस्रायलमधील कमांडो प्रशिक्षणाच्या धर्तीवर मूलभूत व आधुनिक गोळीबाराचे प्रशिक्षण पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येत असून, त्याच अनुषंगाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात आयोजित प्रशिक्षणात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
अचूक निशाणेबाजी, एकाग्रता आणि आत्मविश्वासपूर्ण कामगिरीच्या जोरावर श्रीनाथ महाडिक यांनी हे यश संपादन केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
श्रीनाथ महाडिक यांच्या या कामगिरीचे सोलापूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कौतुक होत असून, त्यांचे यश पोलीस दलातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
