Type Here to Get Search Results !

सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात पोलीस अधिकाऱ्यांचा 'हेरिटेज वॉक' इको फ्रेंडली क्लब आणि वारसा फाउंडेशनचा उपक्रम

 



सोलापूर : भारताचे पहिले गृहमंत्री आणि आधुनिक पोलीस दलाचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर पोलीस दलातील अधिकाऱ्यांसाठी भुईकोट किल्ल्यात विशेष 'हेरिटेज वॉक'चे आयोजन करण्यात आले होते. इको फ्रेंडली क्लब आणि वारसा फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित या उपक्रमात पोलीस अधिकाऱ्यांनी किल्ल्याची तटबंदी, खंदक आणि मध्ययुगीन सुरक्षेचा प्रत्यक्ष अनुभव घेत ऐतिहासिक माहिती जाणून घेतली.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला वसुंधरा मित्र तथा इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. या वेळी बोलताना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या व्यस्त दिनक्रमातून ताणतणावमुक्ती मिळावी आणि शहराचा समृद्ध ऐतिहासिक वारसा प्रत्यक्ष अनुभवता यावा, या उद्देशाने या वारसा भ्रमंतीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर वारसा फाउंडेशनचे संस्थापक व इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांनी भुईकोट किल्ल्याचा इतिहास, तटबंदी, खंदक आणि त्या काळातील सुरक्षा रचनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी इको फ्रेंडली क्लबचे समन्वयक अजित कोकणे यांचीही उपस्थिती होती.


सोलापुरात रुजू झाल्यापासून भुईकोट किल्ल्याला भेट देण्याची संधी मिळाली नव्हती. आज इको फ्रेंडली क्लब आणि वारसा फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे भुईकोट किल्ला जवळून पाहता आला आणि त्याचा गौरवशाली इतिहासही समजून घेता आला, अशा शब्दांत उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


या हेरिटेज वॉकमध्ये गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, विभाग १ चे सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण देवकर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब बिराजदार, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत तसेच पोलीस निरीक्षक बालक कोळी, रवींद्रनाथ भंडारे, भालचंद्र ढवळे, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, भरत चंदनशिव, शैलेश खेडकर, दत्तात्रय काळे, तुकाराम घाडगे, पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे, मनोज मोरे आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.