सोलापूर (प्रतिनिधी ) केंद्र सरकारच्या 'नशामुक्त भारत' मोहिमेअंतर्गत अमली पदार्थांविरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेत सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडाकेबाज कामगिरी केली आहे. सोलापूर-मिरज महामार्गावरील इंचगाव टोलनाक्याजवळ सापळा रचून पोलिसांनी एका स्विफ्ट कारमधून तब्बल १७ किलो ९९४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत गांजा, मारुती स्विफ्ट कार आणि मोबाईल असा एकूण १५ लाख ७९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिलेल्या विशेष सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाईसाठी पथके तैनात केली होती.
सपोनि विजय शिंदे यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल मनोज राठोड यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सोलापूर-मिरज महामार्गावरून एक इसम मारुती सुझुकी स्विफ्ट कारमधून मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन जात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संजय जगताप आणि त्यांच्या पथकाने कामतीकडून बेगमपूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील इंचगाव टोलनाक्याजवळ सापळा रचला.
संशयित पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट कार (क्रमांक MH 10 DQ 8897) येताच पोलिसांनी सतर्क होऊन गाडीला अडवले आणि चालकाला जागीच पकडले. चौकशीत त्याने आपले नाव शुभम लालासाहेब काळे (वय २८, मूळ रा. हरंगुळ रेल्वे जवळ, बार्शी रोड एमआयडीसी, लातूर; सध्या रा. आंबेडकर नगर, अरळी कॉर्नर, जत, जि. सांगली) असे सांगितले.
गाडीतील पोत्याबाबत विचारणा केली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. पंचांसमक्ष पोत्याची तपासणी केली असता त्यात उग्र वास असलेला, ओलसर हिरव्या रंगाचा, पाने, बिया आणि बोंडे असलेला ८ लाख ९९ हजार ७०० रुपये किमतीचा १७ किलो ९९४ ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी गांजासह स्विफ्ट कार आणि मोबाईल फोन असा एकूण १५,७९,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी आरोपी शुभम काळे याच्याविरुद्ध कामती पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३०२/२०२६, एनडीपीएस ॲक्ट (NDPS Act १९८५) कलम ८(क), २०(ब) ii(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला प्रथमवर्ग न्यायालय मोहोळ येथे हजर केले असता न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे. हा गांजा त्याने कोठून आणला होता आणि तो कोणाला विक्रीसाठी देणार होता, याबाबतचा पुढील तपास सपोनि विजय शिंदे करत आहेत.
सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अप्पर पोलीस अधीक्षक (पंढरपूर) श्रीमती प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, सपोनि विजय शिंदे, पोलीस हवालदार दशरथ गोरे, अविनाश पाटील, रवी माने, अतुल घाडगे, पोलीस कॉन्स्टेबल अनवर आत्तार, मनोज राठोड, प्रमोद गायकवाड, राहुल दोरकर तसेच कामती पोलीस ठाण्याचे पोसई अस्मान शेख व पोह/काळजे यांनी पार पाडली.
