Type Here to Get Search Results !

लोकशाही फाउंडेशन आणि बागवान जमियत युवक संघटनेचा स्तुत्य उपक्रम, 117 जणांची मोतीबिंदू तपासणी 73 जणांवर होणार मोफत ऑपरेशन.

 


सोलापूर (प्रतिनिधी )

लोकशाही फाउंडेशन आणि सोलापूर शहर बागवान जमियत युवक संघटनेच्या संयुक्त पुढाकाराने जोडभावी पेठ परिसरातील बागवान जमियतच्या संपर्क कार्यालयात मोफत मोतीबिंदू तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले. शंकर शेठ साबळे नेत्र रुग्णालयाच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले.

नागरिकांना मोतीबिंदूची तपासणी करून गरजू रुग्णांवर मोफत ऑपरेशन करता यावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक हाजी रियाजभाई बागवान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुजीबभाई खलिफा, अफझल सौदागर, जमीर रामपुरे, इब्राहिमभाई मैदर्गीकर आणि डॉ. गौस मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिबिरात सोलापूर शहरातील विविध भागातून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात आली. एकूण 117 जणांची मोतीबिंदू तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 73 रुग्णांवर मोतीबिंदूचे मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी लोकशाही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वसीमराजा बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनच्या संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली. तसेच लोकशाही फाउंडेशनचे आधारस्तंभ जुल्फिकार वडू, अल्ताफ सुरंजी आणि तोसीफ शेख यांनी शिबिराचे नियोजन आणि आयोजन यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

तसेच बागवान जमियत युवक संघटनेचे अध्यक्ष मुश्ताक बागवान (RM), कार्याध्यक्ष सरफराज शेख, मतीन मैदर्गीकर, लियाकत बागवान, बाबा सिंदगीकर, असद बागवान, नावाज बागवान आणि उमर रामपुरे यांच्यासह पदाधिकारी व सभासदांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

लोकशाही फाउंडेशन आणि बागवान जमियत युवक संघटनेच्या वतीने दर महिन्याच्या 1 तारखेला मोफत मोतीबिंदू तपासणी व ऑपरेशन शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांना मोठा फायदा होणार असून, नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.