वर्दीतला माणुसकीचा चेहरा’ राहुल डोंगरे यांच्या संवादातून गावोगावी सुरक्षिततेची जन भावना
गुन्हा घडल्यानंतर कारवाईपेक्षा गुन्हे रोखण्यावर भर; महिला, युवती, युवक अन् ज्येष्ठांशी थेट संवाद साधत सामाजिक ऐक्याला बळ उत्सवांना रक्तदान, वृक्षारोपणाची जोड देणारा ‘लोकाभिमुख’ अधिकारी
पोलीस म्हणजे केवळ कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा नाही, तर समाजाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणारी व्यवस्था आहे. या भूमिकेला माणुसकीची जोड देत ‘पोलीस ठाण्यापर्यंत नागरिकांनी येण्याची वाट पाहण्याऐवजी आपणच गावकऱ्यांपर्यंत पोहोचायचे’, या दृष्टिकोनातून काम करणारे वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांनी आपल्या कार्यशैलीतून वेगळी छाप निर्माण केली आहे.
वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेतला असता, कायदा-सुव्यवस्थेबरोबरच नागरिकांशी थेट संवाद साधण्याला त्यांनी दिलेले महत्त्व प्रकर्षाने जाणवते. हद्दीतील विविध गावांना भेटी देत महिला, युवती, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि समाजातील विविध घटकांशी ते वैयक्तिक गाठीभेटी घेऊन संवाद साधतात. या संवादातून समस्या जाणून घेण्यासोबतच नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता आणि सुरक्षिततेबाबत विश्वास निर्माण करण्याचा नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो.
गुन्हे रोखण्या बरोबर संवादातून बदलाची वाट
गुन्हा घडल्यानंतर तपास आणि कारवाई करणे ही पोलिसांची नियमित जबाबदारी आहे; मात्र गुन्हेगारीची मानसिकता निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक जनजागृतीही तितकीच महत्त्वाची आहे. याच भूमिकेतून राहुल डोंगरे हद्दीतील युवकांशी संवाद साधतात. चुकीच्या संगतीपासून दूर राहणे, कायद्याचे पालन करणे, महिलांचा सन्मान करणे आणि समाजात शांतता राखणे याबाबत ते तरुणांना नेहमीच मार्गदर्शन व समुपदेशन करतात.
महिला आणि युवतींशी संवाद साधताना त्यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी होत असून ‘पोलीस आपल्यासाठी आहेत’ हा विश्वास अधिक दृढ होत आहे.
*गणेशोत्सवापासून यात्रेपर्यंत सामाजिक संदेशाचा ‘फॉर्म्युला*
गणेशोत्सव असो, नवरात्रोत्सव असो किंवा गावोगावच्या यात्रा-जत्रा असोत; सार्वजनिक उत्सव म्हणजे केवळ गर्दी आणि बंदोबस्त नव्हे, तर समाजाला एकत्र आणण्याची संधी आहे, अशी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांची प्रखर भूमिका आहे.
सर्व समाजघटकांनी एकत्रितपणे उत्सव साजरे करावेत, सामाजिक सलोखा टिकवावा आणि उत्सवांना समाजोपयोगी उपक्रमांची जोड द्यावी, यासाठी ते मंडळे व आयोजकांना प्रोत्साहन देतात. रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण आणि सामाजिक जनजागृतीचे उपक्रम राबविण्याचा त्यांचा सातत्याने आग्रह असतो.
त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त आणि सामाजिक बांधिलकी यांचा अनोखा मेळ घालत उत्सवांना सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यशैलीतून दिसून येतो.
*साहेब म्हणण्यापलीकडे आपलेपणाचे दृढ नाते*
कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि सामान्य नागरिकांशी आपुलकीचा संवाद, या दोन्ही गोष्टींचा समतोल साधणे हे पोलिसिंगसमोरील मोठे आव्हान आहे. राहुल डोंगरे यांच्या कार्यपद्धतीत हा समतोल साधण्याचा प्रयत्न जाणवतो.
गावोगावी भेटी, नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद, सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन आणि तरुणाईला सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न यामुळे ते केवळ पोलीस अधिकारी म्हणून नव्हे, तर समाजाशी जोडलेला अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली आहे
*वाढदिवशी एकच अपेक्षा*
वर्दीतील हा माणुसकीचा चेहरा कायम असाच जनतेच्या सेवेत राहो, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची धडपड अधिक बळकट होवो आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आणखी अनेक सामाजिक उपक्रमांना चालना मिळो, हीच नागरिकांची अपेक्षा.
*वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा*
त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि कर्तव्याच्या वाटचालीत यश लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.
*यशवंत पवार*
प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र
संस्थापक - पोलीस मित्र सोशल फौंडेशन
संपादक -सा. कार्यसम्राट
संपादक - कार्यसम्राट न्यूज सोलापूर.
