सोलापूर (प्रतिनिधी ) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील कायदा, सुव्यवस्था व सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जयंती मिरवणुकांमध्ये उच्च क्षमतेच्या डीजे साऊंड सिस्टीम, प्रखर बीम लाईट प्लाझ्मा आणि लेझर लाइटच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातल्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी काढले आहेत.
यापूर्वी देखील महापुरुषांच्या यंती, सण-उत्सवात देखील असे आदेश काढले होते. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार 'डीजे'
व लेझर लाइटवरील निर्बंध १ ते ९ ऑगस्टपर्यंत असणार आहेत.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये पोलिस आयुक्तांनी हे आदेश काढले आहेत. विशिष्ट सार्वजनिक मंडळे मिरवणुकीदरम्यान प्रचंड आवाजाच्या 'डीजे' सिस्टीमचा वापर करतात.
त्यामुळे लहान मुले, वृद्ध नागरिक आणि सामान्य लोकांना कानाचा आणि छातीचा त्रास होऊन कायमचे अपंगत्व किंवा जीवितास धोका निर्माण होण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच, प्रखर लेझर व प्लाझ्मा बीम लाईट्समुळे दृष्टी कायमची जाण्याच भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर शहरात डीजे व लेझर लाईटवर बंदी घातल्याचे सांगितले जात असून उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा युवा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला आहे

