Type Here to Get Search Results !

सोलापुरात 6.80 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; विक्रीसाठी आलेला तरुण शहर गुन्हे शाखेच्या जाळ्यात 34 ग्रॅम मेफेड्रॉनसह आरोपी अटकेत

 



सोलापूर (प्रतिनिधी ) शहर गुन्हे शाखेच्या तपास पथकाने अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत मोठे यश मिळवत 6 लाख 80 हजार रुपये किमतीचे 34 ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले. विक्रीसाठी शहरात आलेल्या रुपेश प्रदीप थडसरे (वय 34, रा. मित्रनगर, शेळगी) याला छत्रपती संभाजी महाराज पुतळा, जुना पूना नाका परिसरातून ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.


शहरात अंमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त एम. राजकुमार आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील यांनी गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे यांच्या पथकाकडून शहरात गस्त सुरू असताना जुना पूना नाका येथील पुलाजवळ संशयास्पद हालचाल करणारा एक तरुण आढळला.


पोलिसांना पाहताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पाठलाग करून त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडील प्लास्टिकच्या पाऊचमध्ये पांढऱ्या रंगाची संशयित पावडर आढळून आली. पोलीस आयुक्तालयाच्या फॉरेन्सिक पथकाने केलेल्या रासायनिक तपासणीत ती मेफेड्रॉन (एमडी) असल्याचे स्पष्ट झाले.


चौकशीत आरोपीने हा अंमली पदार्थ सोलापूर शहरात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये कलम 8(क), 22(ब) आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे करीत आहेत.





         कारवाई करणारे पथक


ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे तसेच बापू साठे, युवराज गायकवाड, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, रामेश्वर साखरे, धीरज सातपुते, अभिजीत पवार, शंकर याळगी, बाळू काळे आणि मच्छिंद्र राठोड यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.