सोलापूर (प्रतिनिधी ) शहर पोलीस दलातील क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) मध्ये कार्यरत असलेल्या वैभव बोराडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे सोलापूर शहर पोलीस दलासह संपूर्ण शहराचा मान उंचावला आहे.
जानकर नगर, लक्ष्मी पेठ (सोलापूर) येथील रहिवासी असलेल्या बोराडे सध्या सोलापूर शहर पोलीस दलात कर्तव्य बजावत आहेत. कठीण व जबाबदारीच्या 12 तासांच्या ड्युटीनंतरही त्यांनी रोज सुमारे सहा तास अभ्यासासाठी वेळ काढत सातत्य राखले. बंदोबस्ताच्या कामात व्यस्त असतानाही त्यांनी अभ्यासात कुठेही तडजोड न करता नियोजनबद्ध तयारी केली.
अभ्यास करताना त्यांनी MPSC च्या प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण केले आणि ‘रिव्हिजन’वर विशेष भर दिला. याच सातत्यपूर्ण मेहनतीचे फळ म्हणून त्यांनी राज्यात अव्वल क्रमांक मिळवला. “वडील महानगरपालिकेत स्वच्छता कामगार म्हणून कार्यरत होते, त्यांचे कष्ट हेच माझ्यासाठी सर्वात मोठे प्रेरणास्थान होते,” अशी भावना बोराडे यांनी व्यक्त केली. त्यांच्या वडिलांनी एक वर्षापूर्वी सेवेतून निवृत्ती घेतली आहे.
PSI परीक्षा राज्यातील अत्यंत स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक मानली जाते. अशा परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणे म्हणजे चिकाटी, शिस्त आणि योग्य नियोजन यांचे उत्तम उदाहरण मानले जाते. नोकरी सांभाळत, वेळेचे अचूक व्यवस्थापन करत त्यांनी अनेक अडचणींवर मात केली.
या यशाबद्दल सोलापूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी तसेच विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळेच हे यश शक्य झाल्याचे बोराडे यांनी नमूद केले.
वैभव बोराडे यांचे यश हे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून, “नोकरीसोबतही मोठे यश मिळवता येते” याचा जिवंत आदर्श त्यांनी घालून दिला आहे. सोलापूर शहरासाठी ही अभिमानाची बाब असून, त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
