सोलापूर (प्रतिनिधी ) शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता राखण्यासाठी पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशेष) डॉ. अश्विनी पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत. हा आदेश २५ मे २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून लागू झाला असून ८ जून २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंत प्रभावी राहणार आहे.
या आदेशानुसार शहरात शस्त्रे, अग्निशस्त्रे, तलवारी, भाले, दंडुके, चाकू, लाठ्या, स्फोटके तसेच सार्वजनिक ठिकाणी उत्तेजक गाणी, संगीत, अश्लील चित्रे किंवा आक्षेपार्ह चिन्हे प्रदर्शित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तसेच पाच किंवा अधिक व्यक्तींच्या जमावास, मिरवणुका, लाऊडस्पीकर, बँड, वाद्ये व फटाके फोडण्यासही मनाई करण्यात आली आहे. मात्र विवाह समारंभ, अंत्यसंस्कार, शैक्षणिक उपक्रम, सरकारी कामकाज, कायदेशीर सभा तसेच प्रशासनाची परवानगी असलेल्या कार्यक्रमांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
हा आदेश शहरातील सार्वजनिक ठिकाणे, न्यायालये, सरकारी कार्यालये येथे प्रसिद्ध करण्यात येणार असून लाऊडस्पीकर व प्रसारमाध्यमांद्वारेही नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ आश्विनी पाटील यांनी दिली आहे.
