सोलापूर (प्रतिनिधी ) शहरातील मार्केट यार्ड
परिसरातील शेतकी फार्मजवळ नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या एका शेतकऱ्याला चार अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना ८ मे रोजी घडली. या प्रकरणी हनुमंत यशवंत कोळी (वय ३५, रा. येणकी) यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणाचा तपास अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह चौघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह अयान अब्दुल कादर शेख (वय २०, रा. मित्र नगर), सोहेल सादिक शेख (वय २२, रा.) चौघांना पोलिसांनी पकडले. यातील अयान व सोहेल याला १ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी फिर्यादी
हनुमंत कोळी यांच्याकडून यूपीआयद्वारे पैसे घेऊन ते पैसे बीअर शॉपीला पाठवून पार्टी केली, अशी माहिती तपासात पुढे आली. ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड, अंमलदार राजेश घोडके, किरण जाधव, दत्ता काटे, दत्ता मोरे, शिव लोहार, अभी पवार यांनी केली.
फिर्यादी हनुमंत कोळी हे ७ मे रोजी कांदे विक्रीसाठी सोलापूर मार्केट यार्ड येथे आले होते. ८ मे रोजी सकाळी हैदराबाद रोडवरील शेतकी फार्मच्या मोकळ्या जागेत नैसर्गिक विधीसाठी थांबले होते. त्यावेळी चार आरोपी आले होते. त्यातील एकाने त्यांच्या दुचाकीची चावी काढून घेतले. दुसऱ्याने पोटाला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी त्यांच्या मोबाइलमधील यूपीआय उघडून फिर्यादीच्या बँक खात्यातून ७३५ रुपये दुसऱ्या खात्यावर वर्ग केले. आरोपींनी ३० हजार रुपये किमतीची दुचाकी, मोबाइल आणि रोख रक्कम असा एकूण ३५ हजार ३०० रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले होते.
