सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर शहरात
घराबाहेर झोपलेल्या ज्येष्ठ महिलेवर हल्ला करून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या एका सराइताला शहर गुन्हे शाखेने २४ तासांच्या आत अटक केली आहे. आरोपीकडून १ लाख ३७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून, या कारवाईमुळे चोरीचे दोन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
२९ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्री इंदुमती साठे या महिलेला घराच्या ओट्यावर झोपल्या असताना एका अज्ञात इसमाने त्यांचे तोंड दाबून धारदार हत्याराने वार केले आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरदस्तीने ओरबाडून नेली होती.
याप्रकरणी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शंकर धायगुडे आणि त्यांच्या पथकाने
तपास सुरू केला. तपासादरम्यान एक इसम सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी सराफ बाजारात येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सिद्धेश्वर मंदिर परिसरात सापळा रचून शकील उदाशा भोसले (वय २०, रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याला शिताफीने ताब्यात घेतले.सदर ची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गौहर हसन पोलीस उपायुक्त गुन्हे विभाग डॉ अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने शहर गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार अंकुश भोसले शैलेश बुगड जावेद जमादार राजकुमार वाघमारे अभिजीत धायगुडे काशिनाथ वाघे आबा साळवे धीरज सातपुते विठ्ठल यलमार महिला अंमलदार ज्योती लंगोटे निलोफर तांबोळी सुमित्रा बारबोले चालक बाळू काळे सायबर सेलकढील प्रकाश गायकवाड मछिंद्र राठोड यांनी पार पाडली.
